
पुसद, दि. २० (प्रतिनिधी) सुरेश भट वाचले नाही, ही अभिमानाची गोष्ट नाही. सहअस्तित्व प्रेमाने नांदू द्या.. गझलेने माणसं जोडली पाहिजेत. तोडायला नको. असे प्रतिपादन विदर्भ विभागीय गझल संमेलनाचे अध्यक्ष श्रीकृष्ण राऊत यांनी पुसद येथे केले. गझल मंथन साहित्य संस्था व यवतमाळ जिल्हा कार्यकारिणी तर्फे पुसद (जि. यवतमाळ) येथे आयोजित विदर्भ विभागीय एक दिवसीय मराठी गझल संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून श्री राऊत बोलत होते. संमेलनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध गझलकार शिवाजी जवरे यांच्या हस्ते झाले. या संमेलनाला प्रमुख अतिथी म्हणून गझलकार अमोल शिरसाट, जयवंत वानखडे उपस्थित होते. दिपक आसेगावकर स्वागताध्यक्ष होते. कार्यक्रमाची सुरूवात प्रज्ञा तगलपलेवार ह्यांनी गायिलेल्या सरस्वती स्तवनाने झाली.याप्रसंगी सुप्रसिद्ध गझलकार गंगाधर मुटे यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. संमेलनात विविध पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. त्यात ख्यातनाम गझलकार श्रीकृष्ण राऊत यांचे ‘गझलेचे उपयोजित छंदः शास्त्र’ या पुस्तकाचे प्रकाशन प्रा. रामप्रसाद तौर यांच्या हस्ते झाले. तर गझलकारा आरती पद्मावार यांचे ‘इच्छा घार होताना’ या गझल संग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक दीपक आसेगावकर यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनल गादेवार व स्मिता पांडे यांनी केले. तर आभार कविता शिरभाते यांनी मानले. यानंतर दुसऱ्या सत्रात दिवसभर सहा मुशायऱ्यांचा आस्वाद रसिकांनी घेतला. मुशायऱ्यांचे अध्यक्षपद श्रीकृष्ण राऊत, अमोल शिरसाट, तेजस भातकुलकर, सुनंदा भावसार, स्नेहा शेवाळकर व सुरेश धनवे यांनी भूषविले. मारुती मानेमोड, गोपाल मापारी, प्रीती वाडीभस्मे, दिपाली सुशांत, स्मिता गोरंटीवार व निशा डांगे यांनी बहारदार सूत्रसंचालन केले. या गझल संमेलनात विदर्भ, मराठवाडा तसेच महाराष्ट्रातील गझलकार सहभागी झाले होते. गझल मंथन साहित्य संस्थेच्या राज्यकार्यकारिणीचे अध्यक्ष अनिल कांबळे, उपाध्यक्ष वासुदेव घुमटकर, सचिव जयवंत वानखडे, सहसचिव उमा पाटील, मार्गदर्शक डॉ. शिवाजी काळे, डॉ. स्नेहल कुलकर्णी, संमेलन समितीचे अध्यक्ष ॲड. मुकुंदराव जाधव, समन्वयक प्रदीप तळेकर यांनी योग्य नियोजन व मार्गदर्शन केले. यवतमाळ जिल्हाध्यक्षा स्नेहा शेवाळकर व शहर संयोजक निशा डांगे यांनी संमेलनाचे उत्तम संयोजन केले. यवतमाळ जिल्हा कार्यकारिणीचे सचिव देवेंद्र जोशी, सहसचिव सुप्रिया पांडे, कोषाध्यक्षा स्मिता पांडे. ग्रामीण संयोजक स्मिता गोरंटीवार, आरती पद्मावार, कविता शिरभाते, सोनल गादेवार, मीनाक्षी गोरंटीवार, सतिष देशमुख, प्रज्ञा आशिष तगलपलेवार, पंकज मारावार यांनी परिश्रम घेतले. पुसद येथील सुप्रसिद्ध गझलकार रवी चापके, गझलकार सुरेश धनवे यांचे सहकार्य लाभले. मीनाक्षी गोरंटीवार ह्यांनी आभार मानले.
