
वॉव समूहाच्या वतीने नासाका माध्यमिक विद्यालयात प्रबोधनप्रसंगी समूहाच्या संस्थापिका अश्विनी न्याहारकर, अध्यक्षा विभा खोत, संचालिका माधुरी कोतवाल, सुनंदा रहाणे, सुषमा जाधव, रेखा म्हस्के, मुख्याध्यापक अरुण पगार आदी.
नाशिकरोड:- ( प्रतिनिधी ) गणेशोत्सव साजरा करताना नद्यांसह पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही, असे प्रयत्न आपण केले पाहिजे. त्यासाठी शाश्वत, पर्यावरणपूरक आणि पुन्हा वापरता येणारी श्री गणेशाच्या धातूच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी. कारण पर्यावरण रक्षण ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन वॉव समूहाच्या रेखा म्हस्के यांनी केले. पळसे येथील नासाका कार्यस्थळावरील माध्यमिक विद्यालयात वॉव समूहाच्या वतीने आरंभ अभियानाच्या द्वितीय वर्षी ‘घरोघरी बाप्पा मनात भक्ती; धातूची मूर्ती देई प्रदूषणापासून मुक्ती’ या उपक्रमात त्या बोलत होत्या. मंचावर वॉव समूहाच्या संस्थापिका अश्विनी न्याहारकर, अध्यक्षा विभा खोत, संचालिका माधुरी कोतवाल, सुनंदा रहाणे, सुषमा जाधव, मुख्याध्यापक अरुण पगार उपस्थित होते. यावेळी वॉव समूहाच्या वतीने विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात आले आणि पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याच्या आवश्यकतेबद्दल माहिती देण्यात आली. मुख्याध्यापक अरुण पगार आणि शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या वतीने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. शिक्षक रवींद्र मालुंजकर यांनी सूत्रसंचालन केले.
