
वाडगाव (प्रतिनिधी)– ग्रामपंचायत, कृषीदुत व जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या संयुक्त विद्यमाने १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचा भव्य सोहळा देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळी ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात सर्व ग्रामस्थ, विद्यार्थी व मान्यवरांची उपस्थिती लक्षणीय होती.कार्यक्रमाची सुरुवात स्वातंत्र्य संग्रामातील वीर शहीदांना अभिवादन करून झाली. ग्रामपंचायत सरपंचांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीताच्या गजराने वातावरण दुमदुमून गेले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून स्वातंत्र्याचा इतिहास, त्याग व बलिदानाची गाथा, तसेच आजच्या पिढीची जबाबदारी यावर प्रकाश टाकला.कृषिदूतांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, स्वातंत्र्य सैनिकांवरील भाषणे विशेषतः लहान मुलांनी सादर केलेले ” हा देश माझा ” हे गीत सर्वांना भावले. यावेळी महिलांनीही सहभागी होत पारंपरिक पोशाख परिधान करून “भारत माता की जय”च्या घोषणा दिल्या.ग्रामपंचायतीतर्फे व कृषिदूतांच्या मदतीने गावातील स्वच्छता, वृक्षारोपण व पाणी संवर्धनाबाबत जनजागृती करण्यात आली. उपस्थित विद्यार्थ्यांना वही , पेन्सिल व खाऊचे वाटप करण्यात आले. वातावरणात देशभक्तीचे रंग पसरले होते, तर मुलांच्या चेहऱ्यावर उत्साह व अभिमान झळकत होता.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षकांनी केले व आभार प्रदर्शन मुख्याध्यापकांनी मान्यवरांचे आभार मानून केले. कार्यक्रमाला गावचे सरपंच ‘सुनील निंबेकर’, उपसरपंच ‘महेश कसबे’ पोलिस पाटील ‘खंडु कसबे’ गावातील सर्व नागरिक, पालक, शालेय शिक्षक, ग्रामपंचायत सदस्य व कृषिदूत असे मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी “जय हिंद, जय भारत”च्या गजरात स्वातंत्र्य दिनाचा उत्सव संपन्न झाला.
