
नांदगाव ( प्रतिनिधी ) वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कारांची घोषणा झाली असून त्या मध्ये नाशिक विभागातून नांदगाव – मनमाड पत्रकार संघाची निवड झाली आहे.सदर पुरस्कार वितरण कार्यक्रम रविवार दि. 22 रोजी कर्जत येथील रॉयल गार्डनमध्ये सकाळी 11 वाजता हा सोहळा होत असल्याची माहिती तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संदिप जेजूरकर आणि संस्थापक अध्यक्ष अमोल खरे यांनी दिली.

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या पत्रमहर्षी रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ आणि वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण आणि राज्यातील तालुका अध्यक्षांचा मेळावा रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे होत आहे. पत्रकार संघ विविध उपक्रम राबवत असल्याने त्यांच्या कार्याचा राज्य पातळीवर सन्मान व्हावा, त्यांचं कौतूक व्हावं यासाठी प्रत्येक महसूल विभागातून एका तालुका पत्रकार संघाची आदर्श पत्रकार संघ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.त्यानुसार नांदगाव- मनमाड पत्रकार संघाची निवड झाली आहे.या निवडीमध्ये नांदगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी ग्रामीण पत्रकारासाठी कार्यशाळा आयोजित केली जाते.तसेच आरोग्य शिबीर,विविध समाज प्रबोधन कार्यक्रम राबवले जात असल्याचे सांगण्यात आले.

पुरस्कार वितरण सोहळयास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, विश्वस्त किरण नाईक,विश्वस्त शरद पाबळे, जिल्हा अध्यक्ष सुनील लोणकर यानी केले.

