
शिक्षणातून मोठ्या प्रमाणात वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होईल आणि त्यामुळे समाजातील अंधश्रद्धांचे प्रमाण हळूहळू कमी होईल, अशी मोठी अपेक्षा होती.
मात्र ती फोल ठरलेली आहे. कारण समाजात सध्या अंधश्रद्धांचे पेव फुटल्याचे दिसत आहे.
अशिक्षितांपेक्षाही शिक्षित समाज अंधश्रद्धेमध्ये जास्त प्रमाणात गुरफटत जात असल्याचे चित्र आहे.

म्हणून युवा पिढीने मोठ्या संख्येने अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यात जाणीवपूर्वक सहभागी झाले पाहिजे, अशी अपेक्षा महाराष्ट्र अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे यांनी व्यक्त केली.
मराठा विद्या प्रसारक समाजाच्या गिरणारे येथील वरिष्ठ महाविद्यालयात चमत्कारा मागील विज्ञान या सप्रयोग व्याख्यानात बोलताना ते पुढे म्हणाले की, अंधश्रद्धा ह्या विकासातील प्रमुख अडथळा असतात. त्यातून व्यक्ती, कुटुंब व समाजाचे सातत्याने शोषण होत असते आणि हे तिन्ही घटक मानसिक गुलामगिरीमध्ये अडकत जातात.
म्हणून तरुण पिढीने स्वतः मधील अंधश्रद्धा जाणीवपूर्वक दूर करण्याबरोबरच समाजातील अंधश्रद्धांच्या निर्मूलनासाठी काम केले पाहिजे.

यावेळी त्यांनी पाण्यावर पेटणारा दिवा, गोड बाबा, मंत्राने वस्तू हवेत तरंगणे, चमच्याने वस्तूला पाणी किंवा दूध पाजणे, अंगात कसे येते अशा विविध प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले.
त्यामागील शास्त्रीय कार्यकारणभाव स्पष्ट करून विद्यार्थ्यांना प्रबोधित केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. सोमनाथ घुले होते .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ. दर्शन कोकाटे, सूत्र संचालन सौ. ज्ञानेश्वरी पवार तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ.अशोक भवर यांनी केले.
