
उरण दि १६(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील फुंडे गावाचा लौकिक वाढविणारा एक ऐतिहासिक क्षण १५ ऑगस्ट रोजी घडला. फुंडे गावातील कु. विनीत प्रविण घरत यांनी चार्टर्ड अकाउंटंट (CA) परीक्षेत यश संपादन करून फुंडे गावाचा पहिला सीए होण्याचा मान मिळवला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाचा गौरव करण्यासाठी ग्रामपंचायत फुंडे यांच्या वतीने स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायत सभागृहात आयोजित कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास सरपंच सागर श्रीधर घरत, उपसरपंच चंद्रकांत म्हात्रे, ग्रामसेवक राजेंद्र सातंगे, महिला सदस्या जुईली घरत, रुविता म्हात्रे, संपदा घरत, ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. सत्कार कार्यक्रमात विनीत यांना मानचिन्ह, पुष्पगुच्छ व शाल नारळ देऊन गौरविण्यात आले.मनोगत व्यक्त करताना विनीत घरत म्हणाले, ‘लहानपणीच माझ्या वडिलांना देवाज्ञा झाली. त्या कठीण प्रसंगानंतरचा प्रवास हा संघर्षमय होता. आज मी येथे उभा आहे. ते माझ्या आई आणि आजीच्या अधक परिश्रम, निस्वार्थ त्याग आणि सातत्यपूर्ण पाठिंब्यामुळे शक्य झाले आहे. त्यांच्या कष्टांचे हे फळ असून, आजचा हा दिवस त्यांच्याच नावे अर्पण करतो. तसेच, माझ्या प्रयत्नांची दखल घेऊन ग्रामपंचायतीने केलेला हा सत्कार माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. यामुळे माझ्या जबाबदारीची जाणीव अधिक वाढली आहे.”सत्कार प्रसंगी बोलताना सरपंच सागर घरत यांनी विनीत यांच्या यशाचे कौतुक करत, गावातील तरुणांनी विनीत यांच्याकडून प्रेरणा घेऊन उच्च शिक्षण व व्यावसायिक क्षेत्रात आपला ठसा उमटवावा” असे आवाहन केले.
