
सिन्नर (ता. सिन्नर) : रामेश्वर मंदिर, महालक्ष्मी नगर येथे सिन्नर पोलीस स्टेशनच्या वतीने नुकतीच कॉर्नर मिटिंग घेण्यात आली. सिन्नर उपनगर व परिसरातील वाढत्या घरफोडी, दुचाकी चोरी, चेन स्नॅचिंगसारख्या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी व नागरिकांमध्ये सुरक्षा जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. या वेळी सिन्नर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक हेमंतकुमार भामरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली चव्हाण, पोलीस कर्मचारी कृष्णा कोकाटे, समाधान बोराडे, विलास बिडगर, मच्छिंद्र खरात, जालिंदर चौघुले, माजी नगरसेवक सोमनाथ पावसे, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण बर्गे, गुलाब पवार, राहूल मोरे, संजय गायकवाड, हरीष भडांगे, वसंत गोसावी गोरक्ष सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात नागरिकांनी आपल्या समस्या मांडत सुरक्षा उपाययोजनांची मागणी केली. यावेळी पोलिस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांनी “शेजारी हा खरा पहारेकरी” या संकल्पनेवर भर देत नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले. तसेच गुन्हे प्रतिबंधासाठी पोलिस प्रशासनाचे उपक्रम, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे महत्त्व, रात्रीची गस्त आणि शेजारील जागरूकता या बाबींवर मार्गदर्शन केले. महालक्ष्मी नगरातील रहिवाशांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून कार्यक्रम यशस्वी केला. सिन्नर पोलीस ठाण्याच्या वतीने शहरातअतिक्रमण विरोधी मोहीम यशस्वी राबवल्यानंतर जनतेच्या सुरक्षेसाठी सुरू केलेल्या जनजागृती उपाययोजनांचे नागरिकांनी स्वागत केले आहे.
