
*नांदगाव (प्रतिनिधी) कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नांदगाव येथे 79 वा स्वातंत्र्यदिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयातील स्वातंत्र्यदिनाचा मंगलमय सोहळ्याचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री शरद पाटील, वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालय स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य- श्री.योगेश बोरसे, डॉ.प्रवीण निकम, श्री.अरविंद पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.एन.भवरे व उपप्राचार्य डॉ.एस.ए.मराठे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते.

महाविद्यालयातील राष्ट्रध्वजाचे पूजन व आरोहण श्री योगेश बोरसे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. स्वातंत्र्यदिन सोहळ्यास उपस्थित असलेल्या मान्यवरांचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविक कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डी.एम.राठोड यांनी केले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली. उपस्थित मान्यवरांनी सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा संचालक प्रा. लोकेश गळदगे व प्रा. बालाजी मोरे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.एस.ए.मराठे यांनी केले. सदर प्रसंगी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून मान्यवरांच्या शुभहस्ते महाविद्यालयातील उद्यानामध्ये वृक्षारोपण करण्यात आले.स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी वृंद,विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

