
नाशिक:-(प्रतिनिधी ) एक रसिक वाचक म्हणून पुस्तके वाचणे अतिशय सोपे असते. मात्र सामाजिक चळवळीचा वारसा जोपासत असताना समाज वाचणे अतिशय क्लेषदायक असते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक विक्रम गायकवाड यांनी केले.
गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने हुतात्मा स्मारकात आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ उपक्रमात २७०वे पुष्प गुंफताना ते “जगणे शोधीत होतो” या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करत होते. अध्यक्षस्थानी नांदगावचे माजी नगराध्यक्ष भास्कर कदम होते.
गायकवाड पुढे म्हणाले की, कविता म्हणजे नात्यातील स्नेहबंधाचे नैसर्गिक अस्तित्व स्वीकारणे होय. कविता ही माणूसपण जागवण्याची कळवळ आहे. मानवी जीवनमूल्ये आणि कल्पक विचाररचना हा आधार या काव्यसंग्रहाचा आहे. सामाजिक, राजकीय आणि संस्थात्मक घडामोडींचे दर्शन कवितामध्ये दिसत असते. अनुभवातून येणारे शहाणपण आणि वास्तवातील सुचलेले शहाणपण यांचे भान या कवितासंग्रहातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे, असे सांगून संग्रहातील जगण्याचे मर्म सांगणाऱ्या विविध कविता सादर केल्या.
पंढरीनाथ जाधव आणि अशोक गांगुर्डे यांना ग्रंथभेट देण्यात आली. सुरेश पवार यांनी सूत्रसंचालन तर ॲड.मिलिंद चिंधडे यांनी आभार मानले. दरम्यान येत्या शुक्रवारी (दि.१२) ज्येष्ठ पत्रकार भावेश ब्राह्मणकर ‘अरुणोदय’ या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करणार आहेत.
