
मखमलाबाद विद्यालयात सहकार महर्षी मालोजीराव मोगल यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करतांना प्राचार्य संजय डेर्ले,पर्यवेक्षक सुनील पाटील,शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी.
मखमलाबाद { वार्ताहर } = मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथे मविप्र संस्थेचे माजी सरचिटणीस सहकारमहर्षी मालोजीराव मोगल यांची जयंती व पुण्यतिथी साजरी करण्यात आली.प्राचार्य संजय डेर्ले,पर्यवेक्षक सुनील पाटील यांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.याप्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ शिक्षक प्रताप काळे,अनिल पगार,तुकाराम तांबे,योगिता मोगल उपस्थित होते.ज्येष्ठ शिक्षिका योगिता मोगल यांनी प्रास्ताविक व मनोगत केले. प्रास्ताविकात त्यांनी मालोजीराव मोगल यांच्या सामाजिक, शैक्षणिक,राजकीय,सहकार क्षेत्रातील कार्याचा आढावा घेतला.निफाड तालुक्याचे तसेच नाशिक जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार लोकनेते मालोजीराव मोगल यांनी ५० वर्षाहून अधिक काळ सार्वजनिक जीवनात मोलाचे योगदान दिले.मालोजीकाकांनी मौजे सुकेणे गावची ग्रामपंचायत व विविध कार्यकारी सहकारी सोसायटीमधून सहकार व राजकीय कारकीर्दीस सुरुवात केली.त्यानंतर १९६० मध्ये निफाड सहकारी साखर कारखाना उभारणीच्या चळवळीत त्यांनी पुढाकार घेतला.त्यांनी कारखान्याच्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी कामे केली.सहकारी उपसा सिंचन योजनांना मदत केली. रस्त्यांची कामे,सर्वाधिक ऊस गाळप,छोटे मध्यम आकाराचे सुमारे दीडशे बंधारे निफाड तालुक्यातील विविध नद्या नाल्यांवर बांधले.गरिबांसाठी कारखान्याच्या माध्यमातून सामुदायिक विवाह चे आयोजन केले.रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन,क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले.सर्वात महत्त्वाचे म्हणजे तालुक्यातील शैक्षणिक संस्थांना व ग्रंथालयांना भरघोस आर्थिक मदत केली. त्यापैकी सर्वाधिक मदत मराठा विद्या प्रसारक समाजाच्या विविध शाखांना झाली.मविप्र शिक्षण संस्थेमध्ये सरचिटणीस असताना त्यांनी संस्थेच्या प्रगतीसाठी अतिशय भरीव काम केले. आपल्या कार्यकाळात त्यांनी संस्थेची त्रिसूत्री शिस्त,गुणवत्ता व पारदर्शकता यावर भर दिला. कु.श्रवणी भालेराव इयत्ता १० वी ड या विद्यार्थिनीने आपल्या मनोगतात सहकार महर्षी मालोजीराव मोगल यांच्या जीवन कार्याविषयी सखोल माहिती दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षिका योगिता मोगल यांनी केले.कार्यक्रमास सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

