
नाशिक ( प्रतिनिधी ): आधुनिक जीवनशैलीच्या वेगवान प्रवाहात माणूस भौतिक प्रगतीकडे झपाट्याने वाटचाल करत असला, तरी निरोगी आणि आनंदी आयुष्य जगण्यासाठी मन:स्वास्थ्य जपणे तितकेच आवश्यक आहे. रोजच्या धकाधकीतून निर्माण होणारे ताणतणाव कमी करणे, व्यसनांपासून दूर राहणे, नियमित व्यायाम, संतुलित आहार, सकारात्मक मानसिकता आणि नातेसंबंधातील सुसंवाद यांची जपणूक हीच निरोगी जीवनाची खरी गुरुकिल्ली असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. मनोज चोपडा यांनी केले.
विश्वास को-ऑप बँक तर्फे आयोजित ‘हृदयरोग आणि बदलती जीवनशैली’ या विषयावरील विशेष मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. विश्वास हब येथे आयोजित या कार्यक्रमाला बँकेचे , अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. चोपडा पुढे म्हणाले की, आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे विशेषतः ३५ ते ५५ वयोगटातील नागरिकांमध्ये हृदयरोग आणि मधुमेहाचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर जीवनशैलीत सकारात्मक बदल करणे अत्यावश्यक आहे. पुरेशी झोप, सोशल मीडियाचा मर्यादित वापर, नियमित आरोग्य तपासण्या, वजन नियंत्रण, निसर्गाशी मैत्री, पालेभाज्या व फळांचा आहारात समावेश, वेळेचे योग्य व्यवस्थापन आणि मेडिटेशन यांचा स्वीकार म्हणजेच निरोगी आरोग्याची प्रभावी जोपासना होय, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ. चोपडा यांनी वैद्यकीय क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, विविध आजारांचे स्वरूप आणि त्यावरील उपचारपद्धती याविषयी पॉवरपॉईंट सादरीकरणाद्वारे माहिती दिली. उपस्थितांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी सविस्तर आणि समर्पक उत्तरे देत आरोग्याविषयी जनजागृती केली.
बँकेचे संस्थापक अध्यक्ष ,विश्वास ठाकूर म्हणाले की, “स्वतःच्या आरोग्याबाबत जागरूक राहणे ही काळाची गरज आहे. नियमित तपासण्या, मनाचे व्यवस्थापन आणि ताणतणावांपासून दूर राहण्याचा प्रयत्न यांतूनच आनंदी आणि समाधानी जीवनाचा मार्ग सापडतो.”
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. सारिका देशपांडे यांनी केले. यावेळी अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. वसंत काळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुरी सरदार यांनी केले.
