
लेखक ~
संजय वसंतराव नलावडे
धोलवड / मुंबई
मोबाइल – ९१६७९३७०४०
सामान्य स्त्री ही केवळ एक गृहिणी किंवा कुटुंबापुरती मर्यादित न राहता आपल्या अफाट कर्तृत्वाने ती घरापासून ते समाजापर्यंत एक नवा आदर्श निर्माण करू शकते. आलेल्या संकटांवर मात करण्याची आणि कोणत्याही परिस्थितीत आपल्या कुटुंबाला स्थिर ठेवण्याची अपार क्षमता एका सामान्य स्त्रीमध्ये असते. अशिक्षित स्त्री सुद्धा आपल्या अंगभूत कौशल्यांमधून, शारिरीक श्रमांतून आणि नैतिक मूल्यांच्या आधारे समाजात अत्यंत मोलाचे योगदान देऊ शकते. पुस्तकी ज्ञानापेक्षा मानवी मूल्यांची जोपासना करून इतरांचा आदर करता करता प्रामाणिकपणे जगणे हेसुद्धा समाजासाठी दिलेले एक मोठे योगदान असते. थोडक्यात सांगायचे तर समाजाचे कल्याण साधण्यासाठी केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे; तर समाजोपयोगी काम करण्याची इच्छाशक्ती असणे गरजेचे आहे. याचे आदर्श उदाहरण म्हणजे एका लहान गावातून किंवा अतिशय छोट्या कुटुंबातून येत असामान्य कामगिरी करणाऱ्या जुन्नर तालुक्यातील शिरोली बुद्रुक गावच्या ‘श्रीमती अनुसयाबाई सावळेराम डबडे’ या मातोश्री होय. अशिक्षित स्त्री सुद्धा आपल्या अंगभूत गुणांमुळे आणि अनुभवातून समाजाला उत्तम संस्कार आणि मार्गदर्शन देऊ शकते हेच श्रीमती अनुसयाबाई सावळेराम डबडे या मातोश्रींच्या जीवनप्रवासावर नजर टाकल्यास लक्षात येते. नुकतीच वयाची शंभरी पार करणाऱ्या श्रीमती अनुसयाबाई सावळेराम डबडे यांनी आयुष्यभर निरपेक्षपणे अत्यंत तोलामोलाची कामगिरी करून समाजाच्या किंवा गावाच्या विकासात मोलाचा वाटा उचलला आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. श्रीमती अनुसयाबाई सावळेराम डबडे या मातोश्रींचा शंभरी पर्यंतचा संघर्षमय जीवनप्रवास अतिशय थक्क करणारा असून नवीन पिढीसाठी प्रेरणादायी आणि आदर्शवत आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात कोतूळ जवळच्या वरची केळी किंवा ‘केळी ओतूर’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या छोट्याशा गावात १९२६ साली अनुसयाबाईंचा जन्म झाला. केळी ओतूर गावातील ‘वैराळ परिवार’ या बऱ्यापैकी समृद्ध असलेल्या कुटुंबातील आई सखुबाई आणि वडील गजानन वैराळ यांना चार मुले आणि अनुसयाबाई हे एकमेव कन्यारत्न असल्याने स्वभाविकच अनुसयाबाईना लहानपणापासूनच सर्वांनी लाडाकोडात सांभाळले. मुंबईतील भायखळा येथे वास्तव्यास असलेले वडील गजानन वैराळ एका छोट्याशा कारखान्यात काम करायचे तर आई सखुबाई भायखळा भाजी मार्केट बाहेर भाजीव्यवसाय करत असत. आईला भाजी व्यवसायात मदत करायला जाणाऱ्या अनुसयाबाईंची अक्षरांशी फारशी तोंडओळख झाली नाही; परंतु आकडेमोडीतील कौशल्य आणि व्यवहारातील बारकावे याचे ज्ञान त्यांना चांगलेच अवगत झाले. वडील गजानन वैराळ अधूनमधून शेतीसाठी गावाकडे जात असत. सखुबाईंच्या भाजी व्यवसायामुळे या भावंडांना घरी रोजच लक्ष्मीदर्शन घडायचे. आईवडिलांच्या योग्य संस्कारांमुळे मुलं शिकून योग्य मार्गाने पुढे जात राहिली; मात्र, अनुसयाबाईने शाळेत जावे असे त्यावेळी फारसे कोणाला वाटले नाही. अनुसयाबाईंचा एक भाऊ जीपीओ मध्ये नोकरीला लागला तर दुसरा मुंबई पोलीस दलात भरती होऊन ‘हवालदार’ म्हणूनच भायखळा परिसरात प्रसिद्ध झाला होता आणि पुढे तो दुबईच्या राजाचा अंगरक्षक म्हणूनही काम करण्यासाठी गेला होता.
जुन्नर तालुक्यातील शिरोली बु. येथील डबडे परिवाराशी या वैराळ परिवाराचा जुना नातेसंबंध असल्याने १९४० साली वयाच्या चौदाव्या वर्षी अनुसयाबाईंचा विवाह उमद्या स्वभावाच्या ‘सावळेराम रखमाजी डबडे’ या सुसंस्कृत तरूणाशी होऊन त्यांचा शिरोली बु. गावातील डबडे परिवारात सून म्हणून प्रवेश झाला. घरची दहा – अकरा एकर शेती असलेल्या रखमाजी डबडे यांच्या सधन शेतकरी कुटुंबात मुंबईतील लखलखीत चंदेरी वातावरणात वाढलेल्या आणि टापटीप राहणाऱ्या अनुसयाबाईंनी सून म्हणून प्रवेश केला तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. प्रवासाच्या साधन सुविधा नसल्याने लग्नानंतर मुंबईला आईवडिलांकडे जाणे – येणे म्हणजे मोठी कठीण गोष्ट! केळी ओतूरला असलेल्या वैराळ परिवाराकडे चिल्हेवाडी घाटातील पायवाटेने जायचं म्हटलं तर एकट्या – दुकट्याचे काम नाही, सोबत कोणीतरी पुरूष माणसं हवीत. सकाळी सुर्योदयाला शिरोलीतून प्रवास सुरू केला तर जेमतेम गडात पडता पडता माणूस केळी ओतूरला पोहचायचा किंवा केळी ओतूरहून निघालेला माणूस शिरोलीला पोहचायचा. अशा परिस्थितीत परतीचे दोर कापल्यासारखी अवस्था अनुसयाबाई या नववधूची झाली नसेल तरच नवल! जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या वाट्याला असा असहाय्यपणा येतो; तेव्हाच व्यवस्था बदलण्याची त्याची आंतरिक इच्छा प्रबळ होते आणि एका नव्या इतिहासाची पाने लिहिली जातात. एकदा मनाने स्वीकारले आणि परिस्थितीशी जुळवून घेता आले की कोणत्याही नववधूचा सासरच्या घरातील पुढचा प्रवास अतिशय सुलभ होतो याची प्रचिती काही कालावधीतच अनुसयाबाईंच्या निमित्ताने शिरोलीकरांना आली. यानंतर जे घडले ते ‘ती आली, तिने पाहिले आणि ती जिंकली सुद्धा!’ या उक्तीला सार्थ ठरवत अनुसयाबाईंनी आपले वैवाहिक जीवन खऱ्या अर्थाने सन्मार्गी लावले.
अनुसयाबाईंनी पदर कंबरेला खोचला आणि आपले यजमान सावळेराम डबडे यांच्याबरोबर शेतात पाऊल ठेवले. आपली शेती किती आहे इथपासून तर शेती कशी करतात इथपर्यंत माहिती करून घेतली आणि यजमानांच्या खांद्याला खांदा लावून मेहनतीची कामे करायला सुरुवात केली. शेतीची त्यांना इतकी आवड निर्माण झाली की आपले सासरे रखमाजी डबडे यांच्या निधनानंतर त्यांनी गावातल्या घरातून आपला मुक्काम शेतावर हलवला आणि एका खोपटात आपला संसार थाटला. शेतीबरोबरच दाराशी गायी, शेळ्या दावणीला उभ्या राहिल्या, हरभरा, शेंगा, बाजरी, ज्वारीच्या पोत्यांची रास गावातील घराच्या आड्यापर्यंत जाऊ लागली. इतरांशी वागताना दाखवलेली नम्रता, प्रामाणिकपणा, आदर आणि माणुसकी किंवा दिलेला शब्द पाळणे, कोणाचीही फसवणूक न करणे या स्वभावगुणांमुळे मुंबईकर अनुसयाबाई कधी शिरोलीकरांची लाडकी झाली हे कोणालाच कळले नाही. भायखळा भाजी मार्केटमध्ये सफाई कामगार व भाजीमालाची चढउतार किंवा ने – आण करणारे हमाल यांच्या डोळ्यात कचरा जाण्याच्या घटना अनेकदा घडायच्या तेव्हा आपल्या साडीच्या पदराने हळुवार हाताने तो कचरा काढणाऱ्या आई सखुबाईंचा डोळ्यातील कचरा काढण्याचा नेमका गुण अनुसयाबाईंनी उचलला होता. आपल्या कुटुंबातील किंवा शेजारीपाजारी कधी कोणाच्या डोळ्यात कचरा किंवा गबाळ गेले तर हळुवार हाताने ते यशस्वीपणे काढणाऱ्या अनुसयाबाई डबडे यांच्याकडे हळूहळू शिरोली गावातूनही डोळ्यात कचरा गेल्याने त्रस्त झालेली बायामाणसं येऊ लागली आणि ‘डोळ्यातील गबाळ काढणारी बाई’ म्हणून अनुसयाबाई डबडे यांची वेगळीच ओळख निर्माण झाली.
त्याकाळात डोळ्यांचे डॉक्टर फक्त मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरातच दिसत होते; आणि खेडोपाडी खास डोळ्यांसाठी अशी वैद्यकीय सेवासुविधा फारशी उपलब्ध नव्हती. त्यामुळे डोळ्यातील गबाळ किंवा कचरा काढणाऱ्या शिरोलीच्या या अनुसयाबाईंच्या कौशल्याची सर्वत्रच चर्चा होऊ लागली. पंचक्रोशीतील कोणालाही अशाप्रकारची डोळ्याची काही समस्या निर्माण झाली किंवा ऊसतोड कामगारांना नेहमीच अशा समस्या यायच्या तेव्हा, ‘शिरोलीच्या गबाळ काढणाऱ्या अनुसयाबाईंकडे जाऊन या’ असा मोफत सल्ला अगदी सहजच दिला जायचा. खरंतर, याचं कोणतंही शिक्षण बाईंनी घेतलं नव्हतं; पण बाईंच्या हाताला गुण होता. कधी कधी कचरा काढण्यासाठी आलेल्यांना बाईंनी, ‘बघू रे…ऽ काय झालं’ असं म्हणावं आणि डोळ्यातून पटकन कापसाचा बोळा फिरवत, ‘हं झालं बघ… हा बघ कापसाला चिकटलाय… चल जा बघू’ असं म्हणत डोळ्यातील कचरा काढावा इतका सहजपणा आपुलकी आणि गोडवा अनुसयाबाईंच्या वागण्या – बोलण्यात होता. अशी माणसं पटकन आपलीशी वाटतात, आदराला पात्र ठरतात, लोकं अशा माणसांबद्दल बाहेर भरभरून चांगलं बोलतात आणि जनमाणसात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतात.
हळूहळू जनावरांच्या डोळ्यातील कचरा किंवा गबाळ काढण्यासाठीही बाईंना गळ घातली जायची आणि त्या मुक्या प्राण्याची असाहयता आणि डोळ्यातून वाहणारे पाणी पाहून अनुसयाबाईंच्या डोळ्यातही पाणी तरळायचे. सुरूवातीला काहीशा नाईलाजाने जनावरांच्या डोळ्यातील गबाळ काढण्याचे प्रयत्न करणाऱ्या बाईंना पुढे चांगले यश मिळत गेले. परिणामस्वरूप; अनुसयाबाई डबडे यांच्या या आगळ्यावेगळ्या कौशल्याचा चांगलाच बोलबाला झाला आणि दूरवरून लोकं किंवा शेतकरी आपल्या जनावरांच्या डोळ्यातील गबाळ काढण्यासाठी त्यांच्याकडे येऊ लागले. कधी कधी एखाद्या माणसाच्या डोळ्याची अवस्था अतिशय नाजूक झालेली असायची किंवा एखाद्या शेतकऱ्याच्या गाड्याच्या खिल्लारी बैलाचा डोळा गबाळ गेल्यामुळे निकामी होण्याच्या मार्गावर असायचा. अशावेळी अनुसयाबाईंची खरी कसोटी असायची; अशा खिल्लारी बैलाने हालचाल करू नये म्हणून त्याला घरासमोरील विजेच्या खांबाला बांधून ठेवले जायचे. अंगभूत कौशल्य, कधी गोमाशीचा वापर, कधी कपबशीच्या बारीक पावडरचा वापर असे विविध प्रकारचे प्रयोग करत गंभीर स्वरूपाच्या डोळ्याच्या केसेसही बऱ्या करण्यात अनुसयाबाईंना यश मिळायचे तेव्हा स्वाभाविकच त्याची सर्वत्र चर्चा व्हायची.
यातील बहुतांशी सेवा विनामोबदला असायची, क्वचित कधी कोणी काही दिले तर दिले; नाहीतर डबडे परिवारच आपल्या घरी आलेल्या प्रत्येकाला उदार अंतःकरणाने पाहुणचार करायचा. खरंतर, घरी पोटापुरती शेती, बैल बारदाना, गायी, शेळ्या, कोंबड्या आणि स्वतःची लेकरं अशी भरपूर कामं होती. परंतु; रोज सकाळपासून दाराशी चार सहा जण डोळ्यातील कचरा काढण्यासाठी येऊन बसू लागले. घरातली सगळी कामं करून त्यांना चहापाणी करणे, जेवणाची वेळ असेल तर जेऊ घालणे किंवा अगदीच संध्याकाळी कोणी दूरवरून आले असेल तर त्याला मुक्कामी ठेवून जेवणासह झोपायची मोफत व्यवस्था करून डोळ्यातील कचरा किंवा गबाळ काढून त्याला त्रासमुक्त करायचे असा अनुसयाबाईंचा प्रदिर्घ काळ दिनक्रम होता. परंतु त्यांनी कधीही कोणाकडे तक्रार केली नाही किंवा पती – पत्नीमध्ये वादविवाद झाला नाही, अतिशय आनंदाने दाराशी आलेल्यांचे स्वागत आणि आदरातिथ्य होत राहिले हीच अनुसयाबाई आणि सावळेराम डबडे यांची मोठी श्रीमंती होती.
जुन्नर, नारायणगाव, ओतूर, पिंपळवंडी यासारख्या गावांमध्ये उत्तम सुविधा असलेल्या माध्यमिक शाळा सुरू झाल्या आणि माझ्याही गावातील प्रत्येक मुलगी – मुलगा शिकला पाहिजे हा ध्यास घेत तत्कालीन सरपंच श्री. निवृत्तीशेठ शेरकर तथा शेठ बाबांनी शिरोलीकरांना शैक्षणिक क्रांतीसाठी तयार केले. यासाठी गावाला लागून किंवा गावाच्या अगदी जवळ एवढ्या मोठ्या जागेच्या उपलब्धतेचा प्रश्न निर्माण झाला असता; शाळेच्या दृष्टीने अतिशय उत्तम जागा म्हणून नदीच्या अगदी किनाऱ्यालगत असलेल्या डबडे आणि पंडीत परिवाराच्या जमिनीचा पर्याय समोर आला. सरपंच श्री. निवृत्तीशेठ शेरकर आणि सावळेराम डबडे यांचे अतिशय मैत्रिपूर्ण संबंध असल्याने एकेदिवशी शेठ बाबांनी, ‘अरे सावळा, आपल्या गावात शाळा बांधायची आहे, तुमची जमीन गावाजवळ आहे, त्यातील काही शाळेसाठी द्याल का’ असे सावळेराम डबडे यांना विचारले. सावळेराम डबडे यांनी डबडे आणि पंडीत परिवाराशी चर्चा करून, ‘शाळेला जेवढी जमीन लागेल तेवढी घ्या’ असे सांगितले आणि एकूण पाच एकर जमीन शाळेला दान केली. ‘शतेषु जायते शूर: सहस्त्रेषु च पण्डित:। वक्ता दशसहस्त्रेषु दाता भवति वा न वा ।।’ शूरवीर मनुष्य शंभरातून एखादा जन्मतो, विद्वान मनुष्य हजारातून एखादा, उत्कृष्ट वक्ता दहा हजारातून एखादा जन्मतो; परंतु दातृत्वाची संवेदना असणारा दाता हा क्वचितच आढळतो. ज्या दानाला प्रतिफलात काहीही नको असते ते खऱ्या अर्थाने उच्चतम कोटीचे सात्विक दान असते. असे दुर्मिळ दातृत्व गुण असलेले दाते आणि शेठबाबांसारखा निष्काम कर्मयोगी शिरोलीच्या भूमीत जन्माला आले आणि न्यू इंग्लिश स्कूल सारखे एक सुंदर ज्ञानमंदिर उभे राहून पंचक्रोशीतील हजारो मुलांचे भविष्य उज्ज्वल झाले.
खरंतर शाळेला जमीन देताना अनुसयाबाईंच्या मनात थोडासा जरी किंतु-परंतु आला असता आणि त्यांनी आपल्या यजमानांना रोखले असते तर अडचण निर्माण झाली असती. परंतु तसे काही न घडता प्रत्यक्षात ग्रामस्थांच्या श्रमदानातून शाळेचे काम सुरू झाले तेव्हा शाळेच्या भिंतीला लागूनच असलेल्या डबडे परिवाराच्या घराचा दरवाजा सर्वोतोपरी सहकार्यासाठी सताड उघडा राहिला. या अनुसयाबाईंची एकूण सतरा बाळंतपणं झाली; परंतु त्यातील काही अपत्य पोटातच गतप्राण झाली, तर काही जन्माला आल्यावर आरोग्याच्या अपुऱ्या साधन सुविधांमुळे किंवा साथीच्या आजारांमुळे वर्षे दोन वर्षातच दगावली गेली. हीरा नावाच्या एका मुलीचा चुन्याच्या घाण्यात पडून अपघात झाला तर सुनिल नावाचा मुलगा वयाच्या एकोणिसाव्या वर्षी ऐन दिवाळीत भाऊबीजेच्या दिवशी मुंबईला रेल्वेतून पडून वारला. संपूर्ण गावावर प्रेम करणाऱ्या अनुसयाबाईंच्या वाट्याला आलेल्या अशा आकस्मिक दु:खद घटनेने संपूर्ण शिरोली गाव हळहळला. सणासुदीचे दिवस असूनही त्या दिवशी गावातील एकाही घरात चूल पेटली नाही की कोणी गोडधोड करून खाल्ले नाही; प्रत्येकाला आपल्या कुटुंबातील व्यक्ती गेल्यासारखे दु:ख झाले होते. त्यानंतर दीड दोन वर्षातच अनुसयाबाईंचे यजमान सावळेराम डबडे यांचेही १९९० साली काहीसे आकस्मिक निधन झाले. अशा घटना घडत राहिल्या; पण अनुसयाबाई न डगमगता हसतखेळत जीवनाला सामोरे गेल्या.
पूर्वी माणसं साखळदंडाच्या कड्यांसारखी एकमेकांत अडकलेली असायाची. प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या वेदनेला सामोरे जावेच लागते, कुणीही त्यातून सुटत नाही. आपल्या आयुष्यात असे अपरिमित दु:ख सोसूनही या आईंची ओंजळ मात्र सदैव भरलेली राहिली; समाजासाठी प्रसन्न मनाने आणि हसतमुखाने ती सतत देतच राहिली. एक अतिशय सामान्य स्त्री असूनही अनुसयाबाई इतरांसारख्या मुलाबाळांत आणि स्वतःच्या संसारात रममाण होऊन गेल्या नाहीत. त्यांनी सातत्याने काही तरी वेगळे करण्याचा प्रयत्न केला आणि आपला आतला आनंद शोधला. धुणीभांडी, अंगणातील साफसफाई किंवा शेतातली कामं करता करता त्या सतत काहीतरी गुणगुणत राहात. शिक्षणाचा फारसा गंध नसलेल्या अनुसयाबाईंना उत्स्फूर्तपणे सुचलेले काव्य म्हणजे बहिणाबाईंसारखेच काहीतरी जीवनाचे तत्त्वज्ञान असावे असे मला वाटते. सात वर्षापूर्वी महिला दिनाच्या निमित्ताने जुन्नर येथील आपला आवाज मराठी चॅनलने अनुसयाबाई डबडे यांची छोटीशी मुलाखत घेतली आणि त्यांना बोलते केले तेव्हा..,
‘ऐक बा तुला सांगतो,
राग कुणाचा धरू नको.
अल्तच भलतंच करण्यासाठी,
सैल मनाला सोडू नको…
अरे धनदौलत आहे कुणासाठी,
तिच्यासाठी तू मरू नकोस.
माणसाचा जन्म तुला रे,
माणुसकीला तू सोडू नकोस…
किंवा
तुळस तू बाई, हिंडू नको जंगलात,
चाल माझ्या वाड्यात, जागा देते अंगणात,
तुळस बाईची थट्टा कोणी केली,
वाऱ्याच्या तोऱ्याने मंजुळं हलविली,
सकाळी उठून दाराला देते थाप,
माझ्या अंगणात वाढला तुळशीचा झाप…
अशा आशयगर्भ कविता बाहेर आल्या. अशा अनेक कविता, ओव्या किंवा जीवनाचे सार अनुसयाबाईंच्या मुखातून निघून हवेत विरून गेले असावे हे नक्की! मूळामध्ये एखादी सामान्य गृहिणी असं गुणगुणते तेव्हा ते कोणी ऐकावे, आपले कौतुक करावे किंवा शाबासकी द्यावी यासाठी नसतेच. पूर्वी पहाटेच्या अंधारात जात्यावर गाणारी प्रत्येक आई त्या चार भिंतींच्या आत आणि गडद अंधारात जे गाणं म्हणायची ते गाणंच तिच्यासाठी आयुष्यातील सगळ्यात मोठा आनंद असायचा. अनुसयाबाई डबडे ही माउली सुध्दा आयुष्यभर अशीच आपल्या स्वतःच्या आनंदासाठी इतरांना आनंद वाटत राहिली म्हणूनच त्यांना शंभर वर्षांचे समृद्ध आणि निरोगी आयुष्य लाभले.
चाळीस बेचाळीस वर्षांपूर्वी अनुसयाबाई डबडे आपल्या मुलीच्या बाळंतपणासाठी जुन्नरला असताना वारकरी संप्रदायाचे भूषण ह.भ.प. गुरूवर्य कोंडाजीबाबा डेरे आवर्जून त्यांना भेटायला आले होते. याप्रसंगी बाबांनी अनुसयाबाईंच्या कामाचे मनापासून कौतुक केले आणि आपल्या गळ्यातील एक तुळशीची माळ काढून आईंच्या गळ्यात घातली. ह.भ.प. गुरूवर्य कोंडाजीबाबा डेरे यांचा कृपाशीर्वाद आईंना लाभला आणि त्यांनी आयुष्यभर वारकरी संप्रदायाच्या आचार विचारांचे पालन केले. किंबहुना आईंच्या पुढील सर्व पिढ्यांनी शाकाहाराचे पालन केले. आईंच्या नव्वदाव्या वाढदिवसानिमित्त त्यांची मुले नातवंडे आणि ग्रामस्थांनी ग्रंथतुला करून आईंचे अभिष्टचिंतन केले होते. नक्षत्राचं देणं काव्यमंच यांनी काही वर्षांपूर्वी ‘समाजभूषण पुरस्कार’ देऊन अनुसयाबाई डबडे यांना सन्मानित केले आहे. अनुसयाबाईच्या ताईबाई, मीराबाई, ताराबाई या मुली, मुलगा अनिल, सून मंदाबाई आणि नातवंडे आईंची सर्वोतोपरी काळजी घेत आहेत. आईंचा नातु प्रा. राजेंद्र सोनवणे यांनी आजीचा कवितेचा वारसा समर्थपणे सांभाळला असून ‘कवी वादळकार’ म्हणून ते संपूर्ण महाराष्ट्रात सुपरिचित आहेत.
‘डोळ्यातील गबाळ काढणाऱ्या बाई’ इथपासून सुरू झालेला प्रवास पन्नास वर्षांनंतर ‘समाजभूषण, डोळ्यांच्या डाॅक्टर, नेत्रतज्ज्ञ, दानशूर, समाजसेविका, गावाच्या लाडक्या, आदर्श माता श्रीमती अनुसयाबाई सावळेराम डबडे’ अशा विशेषणांनी तेजोमय झाला आहे. आजही आयुष्याच्या या टप्प्यावर एक ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून या आजी भावा – भावातील कौटुंबिक वाद, सासू-सुनांमधील मतभेद, नवराबायकोंची भांडणं मिटविण्यासाठी शांतीदूतासारखी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. जुन्नरचे डॉ. सुनिल शेवाळे आजींच्या आरोग्याची यथायोग्य काळजी घेत असतात तर शिरोलीतील डॉ. व्ही. बी. राऊत यांना दिर्घकाळ आजींचे पुत्रवत प्रेम लाभले आहे. येणाऱ्या काळात नक्षत्राचं देणं काव्यमंच, महाराष्ट्र व समस्त ग्रामस्थ शिरोली बुद्रुक यांच्या वतीने श्रीमती अनुसयाबाई सावळेराम डबडे या मातोश्रींचा शतकपूर्ती सोहळा ‘भव्य नागरी सत्कार व ग्रंथतुला’ करून विविध मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा होणार आहे. श्रीमती अनुसयाबाई सावळेराम डबडे या मातोश्रींचा संपूर्ण जीवनप्रवास पाहिला तर ‘कामात देव मानला पाहिजे, मनाची अवस्था कोती असून चालणार नाही, प्रत्येकाने आकाशाएवढे मन केले तरच नव्या पिढीसमोर आदर्श उभे राहतील’ अशी शिकवण आपल्याला मिळते.
~ लेखक ~
संजय वसंतराव नलावडे
धोलवड / मुंबई
मोबाइल - ९१६७९३७०४०
‘निसर्गरम्य जुन्नर – भूमी गुणिजनांची’
🍁🍁🍁 🍁🍁🍁 🍁🍁🍁
