नाशिक:(प्रतिनिधी)-समाजाला दिशा देण्यासाठी आदर्शांची आवश्यकता असते. आपल्या अवतीभवती आदर्श असतात, की जे निष्कलंक आयुष्य व्यतीत करून समाजसेवा करत समाजात. जीवनमूल्ये रूजविण्यासाठी त्यांनी जिवापाड प्रयत्न केले. अशी माणसं विश्वकल्याणासाठी आदर्श कर्माची जोड देऊन अनेक पिढ्याना मार्गदर्शन करतात. हीच माणसं भारत गौरवास पात्र ठरतात, असे प्रतिपादन स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती यांनी केले.
इंटरनॅशनल एक्यू, नाट्रो (ओपीसी) प्रा.लि. आणि मारवाडी गुजराथी कौन्सिल यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या भारत गौरव पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. महंत स्वामी सिद्धेश्वरानंद सरस्वती, डॉ.अजित बागमार आदी मंचावर उपस्थित होते.
अनंत अडचणींवर मात करून सन्मार्गावर निष्ठापूर्वक मार्गक्रमण करून समाजनिर्मितीला हातभार लावणारेच विश्वकल्याणाचे शिल्पकार बनतात, असे गौरवोद्गार स्वामी सिद्धेश्वरानंद सरस्वती यांनी काढले. मान्यवरांच्या हस्ते भारत गौरव पुरस्कार लोककला आणि साहित्यातील योगदानाबद्दल गिरणा गौरव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पवार यांच्यासह डॉ.सच्चिदानंद शांडिल्य, सचिन शाह, डॉ.संजय भावसार, शांतीलाल दुगड, जगन्नाथ काबरा, गिरीश पारख, डॉ.शैलेंद्र दाधिच, शांतीलाल चोरडिया, अंजना जोशी, विनायक लुनीया, गणेश अग्रवाल, अनिलकुमार लोढा, हर्षल कोठावदे, अरविंद श्रीवास्तव यांना प्रदान करण्यात आला. प्रास्ताविक डॉ.अजित बागमार यांनी केले. शरद उगले यांनी सूत्रसंचालन केले तर आभार चेतन जैन यांनी मानले.