
..!*आनंदयात्री बाकीबाब…*दि. ३० नोव्हेंबर १९१० रोजी बाळकृष्ण भगवंत बोरकरांचा जन्म गोव्यातील कुडचडे या गावी झाला. बोरकरांचा जन्म सात्त्विक, देवभोळ्या परिवारात झाला. संध्याकाळी शुभं करोती सोबत एक अभंग म्हणायचा या घराचा परिपाठ. एक दिवस बोरकर अभंग पाठ करायला विसरले. मग त्यांनी स्वतःच एक अभंग रचला आणि ‘बाकी म्हणे’ असे म्हणून त्या अभंगाचा शेवट केला. तेव्हापासून ते सगळ्यांचे लाडके ‘बाकीबाब’ झाले. बोरकरांची मातृभाषा कोकणी. त्यांचे शालेय शिक्षण मराठी माध्यमातून झाले. गोवा पोर्तुगीज अंमलाखाली असल्यामुळे त्यांचे शिक्षण पोर्तुगीज भाषेतून झाले. त्यांनी पोर्तुगीज टीचर्स डिप्लोमा प्राप्त केला होता. प्रापंचिक, आर्थिक अडचणींमुळे त्या पलीकडे शिक्षण ते घेऊ शकले नाहीत. गोव्यातील विविध शाळांमधून त्यांनी इ.स.१९३० ते इ.स. १९४५ दरम्यान शिक्षकाच्या नोकऱ्या केल्या. नंतर ते मुंबईत आले. मुंबईत त्यांनी ‘आमचा गोमंतक’ आणि ‘प्रजेचा आवाज’ या वृत्तपत्रांच्या संपादनाचे कार्य केले. इ.स. १९५५ मध्ये ते आकाशवाणीच्या सेवेत रुजू झाले आणि सेवानिवृत्तीपर्यंत म्हणजेच इ.स.१९७० पर्यंत ते ऑल इंडिया रेडिओच्या सेवेत होते. बाकीबाब यांचा पहिला कविता संग्रह ‘प्रतिभा’ इ.स. १९३० साली त्यांच्या वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी प्रसिद्ध झाला. निसर्ग, विशेषतः गोव्यातील निसर्गाने बाकीबाबना भुरळ घातली होती. निसर्गाच्या विविध रुपांचा काव्याविष्कार त्यांच्या कवितेत प्रकट होत असे. भा.रा.तांबे, बालकवी यांच्या काव्यशैलीचा पगडा बोरकरांवर होता. बालकवींसारखीच त्यांची निसर्ग कविता सहजसुंदर, उत्स्फूर्त आणि उच्च दर्जाची होती. गोवा मुक्ती संग्रामात बोरकरांचा सक्रिय सहभाग होता. इ.स. १९४६ साली डॉ. राममनोहर लोहिया गोवामुक्तीची घोषणा करण्यासाठी गोव्यात आले होते तेव्हा त्यांनी ‘गोयन लोहिया आयलो रे’ हे शीघ्रकाव्य रचले होते. गोवा मुक्ती संग्रामात हे गीत विलक्षण गाजले होते. बोरकरांच्या कवितांमधून देशभक्तीची भावनाही प्रकर्षाने जाणवते. अक्षरगणवृत्ते, मात्रा, जातीवृत्ते यावर बोरकरांचे प्रभुत्व होते. त्यांचे शब्दभांडारही समृद्ध होते. आपल्या नादमय रचनांनी बोरकरांनी काव्यरसिकांना मंत्रमुग्ध केले होते. काव्याव्यतिरिक्त त्यांनी कादंबरी, कथा, ललित लेख, चरित्रात्मक लेख असे सर्वस्पर्शी लेखन केले होते. कोकणी भाषेतही त्यांनी अजरामर साहित्यकृती लिहिल्या आहेत. कोकणीला स्वतंत्र भाषेचा दर्जा मिळावा असा त्यांचा आग्रह होता. ‘एक आनंदयात्रा कवितेची’ या कार्यक्रमात पुलं आणि सुनिताबाईंनी सादर केलेली ‘मंद मंद वाजत आयली तुजी गो पायंजणा’ ही कविता रसिक कधीही विसरू शकणार नाहीत .गोव्याच्या नयनमनोहर निसर्गाच्या सौंदर्याचा आविष्कार बाकीबाब असा करतात.
“माझ्या गोव्याच्या भूमीतगड्या नारळ मधाचे कड्या कपाऱ्यांमधूनघट फुटती दुधाचे !!
माझ्या गोव्याच्या भूमीतआंब्या – फणसांची रास फुली फळांचे पाझरफळी फुलांचे सुवास !!
माझ्या गोव्याच्या भूमीतवनश्रीची कारागिरीपाना – फुलांची कुसरपशु – पक्षांच्या किनारी !!
माझ्या गोव्याच्या भूमीतउन्हाळ्यात खारा वारापावसात दारापुढेसोन्याचांदीच्या रे धारा !!
माझ्या गोव्याच्या भूमीतयेते चांदणे माहेराओलावल्या लोचनांनीभेटे आकाश सागरा !!
माझ्या गोव्याच्या भूमीतचाफा पानाविण फुले भोळा भाबडा शालीनभाव शब्दाविण बोले !!
माझ्या गोव्याच्या भूमीतगडे साळीचारे भात वाढी आईच्या मायेने सोन – केवड्याचा हात !!
माझ्या गोव्याच्या भूमीतसागरात खेळे चांदी आतिथ्याची , अगत्याचीसाऱ्या षडरसांची नांदी !
!इ.स. १९३२ साली बोरकरांच्या कवितेने भारावून जाऊन कवीश्रेष्ठ भा.रा.तांबे यांनी “Here is a new start on the horizon.” असे गौरवोद्गार काढले होते. लौकिक पातळीवरील प्रेम आणि अलौकिक पातळीवरील भक्ती, शृंगार आणि आध्यात्म दोन्हीचा सुरेख संगम त्यांच्या काव्यात प्रत्ययाला येतो.
अनंता तुला कोण पाहू शके ?
तुला गातसा वेद झाले मुके.
मतीमंद अंधा कसा तू दिसे ?
तुझी रुपतृष्णा मनाला असे.
तुझा ठाव कोठे कळेना
जरी,गमे मानसा चातुरी माधुरी.
तरु वल्लरींना भुकी मी पुसे,
तुम्ही निर्मिता देव कोठे वसे ?
भक्ती, सात्त्विकता यांचा पवित्र आविष्कार त्यांच्या कवितेतून होतो. त्याचे श्रेय ते ज्ञानेश्वरीला देतात. “ज्ञानेश्वरी अकराव्या वर्षी माझ्या हातात आली अजूनही मी ती वाचत आहे तेव्हा सारे श्रेय त्या माय माऊलीचे .” बोरकरांच्या अनेक रचनांना जितेंद्र अभिषेकीबुवांनी स्वरसाज दिला आहे. बोरकरांच्या भावकवितांची मोहिनी पुलंवर पण पडली होती, आणि कोकणी हा पुलंचाही जिव्हाळ्याचा विषय. बाकीबाब यांच्या कविता सुनिताबाई आणि पुलं हार्मोनियमवर सादर करीत तो आनंदयात्री अनुभव असे. इ.स. १९६७ साली भारत सरकारने बोरकरांचा ‘ पद्मश्री ‘ पुरस्काराने सन्मान केला होता. दि. ८ जुलै १९८४ रोजी वयाच्या ७४ व्या वर्षी बोरकरांनी इहलोकीची यात्रा संपवली.गोव्याच्या यक्षभूमीतून नक्षत्रांचे देणे देऊन गेलेल्या ह्या मनस्वी प्रतिभावंत कवीचे मराठी साहित्यातील योगदान अभूतपूर्व आहे. त्यांचे काव्य त्यांच्या प्रतिभेचे दिव्यत्व दाखवते, म्हणून त्यांच्याच शब्दात त्यांना वंदन !”दिव्यत्वाची जेथ प्रतीती तेथे कर माझे जुळती !”-
*रविराज सोनार*
