लेखक:- प्रा.अशोक सोनवणे , नाशिक

सार्वजनिक जीवनात वावरताना सामाजिक नीतिमत्ता खूपच जपावी लागते.सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेनं कामं करतांना सामाजिक हिताची जाणीव सदैव ठेवावी लागते.अशाप्रकारची समाजाच्या विकासाची लोकाभिमुख आणि रचनात्मक कामे उभी करणारी व्यक्तीमत्व ही ख-या अर्थाने थोर असतात.त्यांना ” लोकनेता “या अर्थाने संबोधले जाते.निफाड तालुक्याचे तसेच नाशिक जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार लोकनेते मालोजीराव मोगल यांचा आज ८जुलै हा जन्मदिवस आणि स्मृतीदिन आहे.मालोजीराव तथा काकासाहेब मोगल हे सलग पन्नास वर्षांहून अधिक काळ सार्वजनिक जीवनात कार्यरत होते.त्यांचे सुरुवातीचे शिक्षण पुण्यातील शिवाजी मराठा बोर्डिंगमध्ये झाले.ही बोर्डिंग थोर शिक्षणतज्ज्ञ व समाज सुधारक आणि सत्यशोधक स्व.गुरुवर्य बाबुराव जगताप चालवत होते. काकसाहेबांवर थोर नेते देशभक्त कै. केशवराव जेधे यांच्या विचारकार्याचा खूप मोठा प्रभाव होता. विद्यार्थी दशेत असतानाच त्यांनी सरकारी कार्यालयावर तिरंगा ध्वज फडकवला.परिणामी त्यांचे नाव शाळेतून काढून टाकले.पुढील शिक्षण इगतपुरी येथे झाले. इगतपुरी येथील रेल्वे स्टेशनवर जाऊन त्यांनी महात्मा गांधीजींच्या गळ्यात स्वतः विणलेल्या सुताचा हार घातला. मॅट्रीकपर्यंत शिक्षण झाल्यानंतर ते सार्वजनिक जीवनात कार्यरत झाले.मौजे सुकेणे गावची ग्रामपंचायत व वि.का.सह.सोसायटीमध्ये ते कार्यरत झाले. १९६० पासून निफाड सहकारी साखर कारखाना उभारण्याची चळवळ सुरू झाली.या प्रक्रियेत काकासाहेब मोगल प्रथमपासूनच सहभागी होते. त्यांच्यावर प्रथमपासूनच कॉँग्रेसच्या विचारधारेचा प्रभाव होता. १९५७ साली संपन्न झालेल्या राज्य विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी कॉँग्रेस पक्षाचे उमेदवार स्व.दगुनाना मोरे यांचा मोठ्या हिरीरीने प्रचार केला होता.कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्यावर त्यांची नितांत श्रद्धा होती, म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली काकासाहेब मोगल काम करीत होते.निफाड सहकारी साखर कारखान्याच्या उभारणी कार्यात ते सक्रिय सहभागी होते. कर्मवीर भाऊसाहेब हिरे, कर्मवीर काकासाहेब वाघ यांच्या समवेत त्यांनी काम केले.१९६३-६४ साली निफाड सहकारी साखर कारखान्याचा पहिला गळीत हंगाम काकासाहेब मोगल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. त्यावेळी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक साहेब व स्व.वसंतरावदादा पाटील ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत गळीत हंगाम सुरू झाला. पुढे स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांनी कारखान्याला भेट दिली. त्यांनी अल्पावधीत हा कारखाना उभारल्या बद्दल सर्वांचे अभिनंदन केले. पुढे काकासाहेब मोगल यांनी अनेक वर्षे कारखान्याच्या संचालक मंडळात काम केले.तीन वेळा कारखान्याचे अध्यक्षपद भूषविले.त्यांच्या कार्यकाळात कारखान्याला केंद्र सरकारचा उत्कृष्ट कार्यक्षमतेचा पुरस्कार प्राप्त झाला.हा पुरस्कार त्यांनी तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री डॉ.बलराम जाखड यांच्या शुभहस्ते स्वीकारला.कामगारांना ५२टक्के इतका घसघशीत बोनस दिला,हा त्यावेळचा एक विक्रमच होता.राज्यातील कोणत्याही सहकारी साखर कारखान्याने आतापर्यंत एवढा बोनस आपल्या कर्मचाऱ्यांना दिला असेल का ? राज्य सहकारी साखर कारखाना संघाच्या वार्षिक सभेत आदरणीय मुख्यमंत्री शरदराव पवार साहेबांनी याबद्दल आश्चर्य व्यक्त केले होते.काकासाहेब मोगल यांनी कारखान्याच्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी कामे केली.सहकारी उपसा सिंचन योजनांना मदत केली.रस्त्यांची कामे केली, सर्वाधिक उस गाळप केले.छोटे मध्यम आकाराचे सुमारे १५० बंधारे निफाड तालुक्यातील विविध नद्या नाल्यांवर बांधले. गरिबांसाठी कारखान्याच्या माध्यमातून सामुदायिक विवाहांचे आयोजन केले व प्रत्येक नवदांपत्याला सुमारे दहा हजार रुपये पर्यन्तच्या संसारोपयोगी वस्तू कारखान्याच्या वतीने भेट म्हणून दिल्या, रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन केले, क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले,सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तालुक्यातील शैक्षणिक संस्थांना व ग्रंथालयांना भरघोस आर्थिक मदत केली.त्यापैकी सर्वाधिक मदत मराठा विद्या प्रसारक समाजाच्या विविध शाखांना झाली. १९६७ साली ते नाशिक जिल्हा परिषदेचे सदस्य झाले.जिल्हा परिषदेचे शिक्षण आणि आरोग्य, शेती व दुग्धविकास, बांधकाम व स्थायी या समित्यांचे सभापती म्हणून त्यांनी काम केले.जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले.या माध्यमातून त्यांनी अनेक लोकोपयोगी कामे केली.मराठा विद्या प्रसारक समाजाच्या विविध शाखांना त्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यात त्यांनी सदैव पुढाकार घेतला.त्यात प्रामुख्याने काजीसांगवी,वडनेर भैरव, कोठूरे या शाळा, तसेच पिंपळगाव बसवंत येथील महाविद्यालय नाशिक येथील के.टी.एच.एम व सिन्नर येथील महाविद्यालय आदी शाखांना त्यांनी आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले. त्या दृष्टीने दि. २८ नोव्हेंबर १९७० रोजी जिल्ह्यातील माध्यमिक शाळा व आश्रम शाळांच्या इमारत बांधकामासाठी जिल्हा परिषदेने अनुदान द्यावे असा ठराव काकसाहेबांनी मांडला व स्व. मूळचंदभाई गोठी यांनी त्यास अनुमोदन दिले. जिल्हापरिषदेने शाळांच्या इमारत बांधकामासाठी ७० हजार रुपये मंजूर केले. त्यावेळी संस्थेला उत्पन्नाची फारशी साधने उपलब्ध नव्हती त्यामुळे अशाप्रकारची मदत संस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची होती.संस्थेचे तत्कालीन सरचिटणीस स्व.अॅड.बाबुरावजी ठाकरे साहेब यांची व काकासाहेब मोगल यांची घनिष्ठ मैत्री होती. काकासाहेब मोगल यांनी जवळपास तीस वर्षे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळात काम केले.तीन वेळा बॅंकेचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले.शेतक-यांना अधिकाधिक मदत त्यांनी उपलब्ध करून दिली.काकासाहेबांच्या कार्यकाळात निफाड सहकारी साखर कारखाना व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या दोन्ही सहकारी संस्था वैभवाच्या शिखरावर होत्या.आज जिल्ह्यातील सहकार संस्थांची अवस्था पाहता काकासाहेब मोगल यांच्या सहकारातील कार्यकौशल्याची, त्यांच्या आदर्श व्यवस्थापनाची आणि लोकाभिमुख नेतृत्वाची आवर्जून आठवण होते. जिल्ह्यातील महत्वाची शिक्षण संस्था म्हणजे मराठा विद्या प्रसारक समाज ही संस्था होय.काकासाहेब मोगल यांनी या संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या विविध पदांवर काम केले.एकदा संचालक,तीन वेळा उपसभापती एकदा सभापती व एकदा सरचिटणीस म्हणून त्यांनी काम पाहिले.संस्थेला या कालावधीत त्यांनी सर्वतोपरी मदत केली.निफाड सहकारी साखर कारखाना, जिल्हा परिषद, जिल्हा बँक व सरकारच्या माध्यमातून त्यांनी मदत उपलब्ध करून दिली. या संस्थेचे सरचिटणीस म्हणून काम करताना त्यांनी संस्थेच्या सर्वांगिण विकासासाठी महत्वपूर्ण भूमिका निभावली. सध्याचे संस्थेचे मध्यवर्ती कार्यालय त्यांचाच कार्यकाळात पूर्ण झाले. विद्यार्थी व सेवकांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले.फिक्स पे वर काम करणाऱ्या सेवकांना वेतन वाढ दिली.विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण संस्थेत संगणक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले.गुणवत्ता वाढीवर भर दिला.त्यावेळी स्व.डॉ.दौलतराव आहेर हे संस्थेचे अध्यक्ष तर स्व.अॅड.विठ्ठलराव हांडे हे सभापती होते.तत्कालीन संचालक मंडळाने खूप चांगले निर्णय घेतले.संस्थेच्या देवळाली कॅम्प येथील महाविद्यालयाचे बांधकाम न्यायालयीन प्रक्रियेमुळे थांबले होते.न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर वेगाने बांधकाम पूर्ण झाले.या महाविद्यालयास स्व.कांतीभाई तेजूकाया आणि त्यांच्या परिवाराने फार मोठी मदत केली आहे.त्यांनी केलेल्या मदतीमुळे हे महाविद्यालय आज मोठ्या दिमाखात उभे आहे.स्व.कांतीभाई तेजूकाया आणि काकासाहेब मोगल यांची निफाड सहकारी साखर कारखान्याच्या उभारणी काळापासून मैत्री होती.निफाड येथील महाविद्यालयाची पूर्वीची इमारत फारच धोकादायक होती.ती पाडून नवी इमारत बांधण्याशिवाय पर्यायच नव्हता.इमारतीचा काही भाग पाडून नवीन बांधकाम सुरू झाले होते.काकासाहेबांनी त्या बांधकामाला गती दिली.ओझर येथील महाविद्यालय इमारत बांधकाम रेंगाळले होते.पिंपळगाव येथील महाविद्यालयाचा विस्तार करायचा होता.सायखेडा, त्र्यंबकेश्वर येथे नवीन महाविद्यालय सुरू करण्यात आले होते.या महाविद्यालयांना सरकारी मंजूरी मिळवून देण्यासाठी स्व.डॉ.दौलतराव आहेर यांची मदत झाली. सायखेडा येथील महाविद्यालयासाठी जमीन मिळविणे आवश्यक होते.सायखेडा येथील संत कृष्णाम्माचारी स्वामी यांचेशी काकासाहेब मोगल यांनी संपर्क साधला तेव्हा कै.शंकरबाबा कुटे यांची मोठी मदत झाली.त्यामुळेच संस्थेला २००० साली ४१ आर जमीन मिळाली.पुढे डॉ.स्व.वसंतराव पवार यांच्या प्रयत्नातून आणखी जागा मिळाली.श्रीमती नीलिमाताई पवार यांच्या कार्यकाळात महाविद्यालयाचे बांधकाम पूर्ण झाले.ओझर, निफाड व पिंपळगाव येथील महाविद्यालय उर्वरित बांधकाम करण्यासाठी काकासाहेब मोगल यांनी चालना दिली.१९९८-२००० या कालावधीत काकासाहेब मोगल यांनी कोट्यवधी रुपयांची मदत निफाड कारखान्याच्या माध्यमातून संस्थेला केली.कारखान्याने अनेकदा संस्थेला भरभरून मदत केली.सिडकोमध्ये संस्थेने नव्याने माध्यमिक शाळा सुरू केली.परंतु जागा खूपच कमी पडत होती.संस्थेने सिडकोकडे महाविद्यालयालगत असलेला भूखंड शाळा इमारतीसाठी मागितला. सदरचे प्रकरण मुंबई येथील सिडकोच्या मुख्य कार्यालयात पाठवले.तेंव्हा मा.श्री.विश्वासराव धुमाळ हे सिडकोचे कार्यकारी संचालक होते.त्यांची व काकासाहेब मोगल यांची घनिष्ठ मैत्री होती. सदर प्रकरणाची फाइल धुमाळ साहेबांपुढे आल्यानंतर त्यांनी काकासाहेब मोगल यांची सही पाहिली आणि काकासाहेबांच्या प्रकृतीची चौकशी केली.विश्वासराव धुमाळ हे जेव्हा आय एम एस उत्तीर्ण झाले तेव्हा त्यांची पाहिली नेमणूक निफाडचे प्रांताधिकारी म्हणून झाली. काकासाहेब मोगल यांची धुमाळ साहेबांचे पिताश्री कै. शंकरराव धुमाळ यांच्याशीही मैत्री होती, त्यामुळे धुमाळ साहेबांबद्दल काकसाहेबांना विशेष आत्मीयता वाटत होती. त्यामुळे धुमाळ साहेबांनी संस्थेच्या कामात जातीने लक्ष घातले व हा भूखंड संस्थेला शैक्षणिक कामासाठी देत असल्याचे त्वरित संस्थेला पत्र दिले.त्याच कार्यकाळात संस्थेने अभियांत्रिकी महाविद्यालय आणि सात आयटीआय सुरू केले. अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यासाठी तातडीने दोन कोटी रुपयांची बॅंक गॅरंटी देणे आवश्यक होते.काकासाहेबांनी माजी खा.स्व.माधवराव(आप्पासाहेब) पाटील यांना जनलक्ष्मी सहकारी बॅंकेतून तातडीने दोन कोटी रुपयांची बॅंक गॅरंटी देण्याची विनंती केली.याकामी तत्कालीन संचालक डॉ.भाऊसाहेब मोरे याची मोठी मदत झाली.या कर्जासाठी प्रा.बाळासाहेब पिंगळे आणि कै.प्रा.डी.जी.शिंदे हे जामीनदार झाले.विद्यापीठ पातळीवर स्व. डॉ.वसंतराव पवार व भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ.शिवाजीराव कदम यांची खूप मदत झाली.महाविद्यालयास शासनाची मंजुरी आणि इतर परवानगी मिळविण्यास स्व.डॉ.दौलतराव आहेर यांची खूपच मदत झाली.संस्थेला वैद्यकीय महाविद्यालय मिळावे यासाठी संस्थेने खूप प्रयत्न केले. डॉ.स्व.वसंतराव पवार यांनी त्यासाठी आग्रहाने पुढाकार घेतला होता.श्रीमती पुष्पाताई हिरे,अॅड.विठ्ठलराव हांडे यांचेबरोबरच काकासाहेब मोगल यांनी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री शरदराव पवार यांचेकडे आग्रह धरलेला होता. जिल्ह्यातील आमदारांचे शिष्ट मंडळ काकसाहेबांच्या नेतृत्वाखाली पवार साहेबांना भेटले होते. मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक या महाराष्ट्रातील अग्रगण्य शिक्षण संस्थेत काकासाहेब मोगल यांनी अनेक वर्षे सेवाभावी वृत्तीने काम केले.सुकेण्यातील शाळा उभी करण्यात त्यांचं मोठं योगदान आहे.त्यावेळी अनेक शाळांना स्वतःची इमारत नव्हती.काकासाहेबांच्या कार्यकारी मंडळाने विशेषतः ग्रामीण भागातील शाळांच्या इमारत बांधकामास प्राधान्य दिले.काकासाहेब मोगल यांचा अमृत महोत्सव पिंपळगाव येथे संपन्न झाला. त्या निमित्ताने कार्यकर्त्यांनी जमविलेल्या निधीचा मोठा भाग काकासाहेब मोगल यांनी वणी येथील कर्मवीर रावसाहेब थोरात विद्यालयाच्या इमारत बांधकामासाठी देणगी म्हणून दिला.मराठा विद्या प्रसारक समाजाच्या वाटचालीत काकासाहेब मोगल यांचे योगदान फार महत्वपूर्ण राहिलेले आहे. काकासाहेब मोगल यांनी १९८० ते १९९५पर्यंत निफाड मतदारसंघाचे राज्याच्या विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व केले.निफाड तालुक्यातील अनेक प्रश्न सोडविण्यासाठी ते प्रयत्नशील होते.त्यांनी सर्वाधिक प्राधान्याने पाणी प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले.अनेक सहकारी उपसा सिंचन योजना कार्यान्वित केल्या.सरकारी पातळीवरून या योजनांना परवानगी मिळवली.या योजनांसाठी नाबार्ड, जिल्हा सहकारी बँक यांच्या माध्यमातून अर्थपुरवठा उपलब्ध केला.निफाड सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून आर्थिक मदत उपलब्ध करून दिली.पालखेड डाव्या कालव्याच्या पोटचा-यांची कामे तसेच ओझरखेडच्या कालव्यांची व चा-यांची कामे पूर्ण करण्यासाठी सतत पाठपुरावा केला.तालुक्यातील वीज प्रश्न,रस्त्यांचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न, दुर्बल घटकांचे प्रश्न,शेतक-यांचे प्रश्न, शेती मालाच्या बाजार भावांचे प्रश्न, शेतमाल प्रक्रिया,आदी अनेक प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी अगदी तळमळीने प्रयत्न केले.शेतक-यांनी मोठ्या कष्टाने पिकविलेला कांदा मातीमोल भावाने विकला जात होता.काकासाहेबांनी तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय श्रीयुत शरदराव पवार साहेबांकडे आग्रह धरला आणि शेवटी सरकारने मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करण्याचा क्रांतिकारक निर्णय घेतला.ठिबक सिंचन साठी सरकारने ५०टक्के अनुदान द्यावे असा आग्रह काकासाहेबांनी सरकारकडे धरला.शेवटी ठिबक सिंचनासाठी अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला.असे कितीतरी लोककल्याणाचे निर्णय सरकारला घेण्यास भाग पाडले. काकासाहेबांनी सत्ता संपत्ती साठी कधीच राजकारण केले नाही.सत्तेच्या माध्यमातून संपत्ती उभी केली नाही.सत्ता ही लोकसेवेचे साधन आहे,हाच त्यांचा दृष्टिकोन होता.त्यांनी दरबारी राजकारण कधी केले नाही.सर्वांना सहज उपलब्ध असलेले आमदार अशीच त्यांची प्रतिमा होती. काकसाहेबांनी अनेक निवडणुका लढविल्या अनेक वेळा जिंकले काही वेळा पराभूत झाले. पराभूत झाल्यामुळे ते कधी हताश झाले नाही किंवा निवडणूका जिंकल्यामुळे सत्ता त्यांच्या डोक्यात गेली नाही. त्यांचे पाय सतत जमिनीवरच होते. निवडणूक संपल्या की सर्वांना बरोबर घेणं हा त्यांचा स्वभाव होता.काकासाहेबांच्या काळातील राजकारण आज राहिले नाही. कार्यकर्त्यांंचं खूप मोठं संघटन त्यांनी उभं केलेलं होतं.कार्यकर्त्यांची ताकद हेच त्यांच बळ होतं.त्यांनी कार्यकर्त्यांना खूप जपलं.शेवटपर्यंत त्यांनी कार्यकर्त्यांच्या कामांना प्राधान्य दिले.लोकांसाठी आयुष्यभर प्रामाणिकपणे झटणारा असा नेता आता होईल का? स्व.काकासाहेब मोगल यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.. प्रा.अशोक सोनवणे
