
नांदगाव(प्रतिनिधी).शनिवार दि. ४ जुलै २०२५ आज रोजी विद्यालयाच्या वतीने आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर गावातून दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी सजवलेल्या पालखितून विठ्ठल रखुमाईच्या मुर्ती तसेच ग्रंथराज ज्ञानेश्वरीची स्थापना करून भव्य मिरवणूक काढण्यात आली. प्रसंगी नस्तनपूर वारकरी संस्थान मधील गायक वादक विद्यार्थी तसेच गावातील भजनी मंडळ, शाळेचे विद्यार्थी, मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ यांच्या सहकार्याने दिंडी सोहळ्यास सुरूवात झाली. शाळेपासून निघालेली दिंडी हनुमान मंदिरचौक , ग्रामपंचायत चौक, साईबाबा चौक अशी गावातील चौकाचौकातून नाचत गात व फुगड्या खेळत परत शाळेजवळ पोहचली. गावातून दिंडी जात असताना गावातील माताभगीनींनी पालखीतील भगवान विठ्ठलाच्या मुर्तीचे मनोभावे पूजन केले व ग्रामस्थांनी दर्शन घेतले. कुमारी अपेक्षा सोर हिने भगवान विठ्ठल व कुमारी मृणाली मोरे हिने माता रूख्मीनीच्या पेहरावात सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ईतर विद्यार्थीनींनी नउवारी साडी व डोक्यावर तुळशी वृंदावन घेत साक्षात माऊलींच्या दिंडी सोहळ्याचे चित्र उभे केले. अनेक विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांच्या वेशभूषेत अक्षरशः पंढरपूरच्या दिंडी सोहळ्याची आठवण करून दिली. टाळ मृदंगाच्या व हरिनामाच्या गजरात गावातील वातावरण भक्तीमय झाले. सेवटी शाळेच्या प्रांगणात मोठा रिंगण सोहळा रंगला. यात नस्तनपूर संस्थानचे महाराज मंडळी, शाळेचे विद्यार्थी, विद्यार्थीनी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद सहभागी झाले. टाळ मृदंगाच्या गजरात विद्यार्थी विद्यार्थीनी व शिक्षक फुगडी खेळण्यात दंग झाले. सोहळ्यातील गायन वादन, सजावट ई.साठी भजनी मंडळातील मा. मधुभाऊ घोटेकर, नानाभाऊ तांदळे, दादाभाऊ जाधव, रविंद्र गरूड, नवनाथ सोमवंशी, दत्ताभाऊ घोटेकर, दिपक आहेर,गोकुळ जाधव, राजु मवाळ, प्रमोद सोनवणे, संदीप पाटील , निलेश चाकणकर, रविंद्र जाधव शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनिल बोरसे, आबासाहेब सोनवणे व संदीपभाऊ मवाळ मित्रमंडळाचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाची संकल्पना शाळेचे मुख्याध्यापक मा. काशिनाथ गवळी यांची होती तर जेष्ठ शिक्षक मा. संजय कांदळकर, श्रीमती अलका शिंदे, मा. कैलास पठाडे, मा. लक्ष्मण जाधव, मा. उत्तम सोनवणे,मा. संदीपभाऊ मवाळ, मा. आबासाहेब सोनवणे यांनी विशेष परिश्रम घेऊन अनमोल सहकार्य केले. विजय शिक्षण प्रसारक मंडळाच्या पदाधिकारी व संचालक मंडळाने कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल शुभेच्छा देऊन सर्वांचे कौतुक केले.
