
लासलगाव (प्रतिनिधी ) दिनांक 5 फेब्रुवारी येथील नूतन विद्या प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त पर्यावरण पूरक दिंडीचे आयोजन करण्यात आले. वारकरी वेष परिधान करुन, डोक्यावर तुळशी वृंदावन, हातात टाळ-चिपळ्या घेऊन मुखी पांडुरंगाचा नामघोष करत विद्यार्थ्यांनी आषाढी वारीचा अनुभव घेतला. आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांची दिंडी व पर्यावरण पूरक दिंडीने साऱ्यांचेच लक्ष वेधले. यावेळी महाविद्यालयातील बहुतांश विद्यार्थी वारकरी वेशभूषेत आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे, उपप्राचार्य डॉ.सोमनाथ आरोटे, उच्च माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक श्री.उज्वल शेलार, ज्येष्ठ शिक्षक श्री.किशोर गोसावी यांच्या हस्ते विधिवत पूजन केले व प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांनी दिंडीस शुभेच्छा देऊन दिंडी गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे वारकरी यांचे समवेत भजन व विठुरायाचा जयघोष व टाळांचा निनाद करत मार्गस्थ झाली. त्यातून वृक्षारोपणाचा संदेश देत जनजागृती करण्यात आली. दिंडीला परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सरस्वती शाळेच्या प्रांगणात विठुरायाच्या भजनांनी व सर्व वारकऱ्यांनी रिंगण सोहळ्यात सहभाग घेऊन विठ्ठल नामाचा जयघोष केला. दिंडीचा समारोप महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आला. यावेळी प्रसाद म्हणून सर्व विद्यार्थ्यांना केळी वाटप करण्यात आले.सदरची दिंडी यशस्वी होण्यासाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदरावजी होळकर आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली रा.से.यो. कार्यक्रमाधिकारी श्री.सुनिल गायकर, श्री.देवेंद्र भांडे आणि उच्च माध्यमिक विभागातील प्राध्यापकांनी संपूर्ण नियोजन केले.
