
सापडलेले पाकीट प्रामाणिकपणे परत करून दिला प्रामाणिकतेचा संदेश..
सटाणा : (प्रतिनिधी ) मराठा विद्या प्रसारक समाज संचलित जिजामाता गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सटाणा येथील इयत्ता सातवीमधील विद्यार्थिनी कु. आराध्या संजय सोनवणे हिने प्रामाणिकपणाचे उत्कृष्ट उदाहरण समाजासमोर ठेवले आहे.कु. आराध्या ही अजमेर सौंदाणे येथून दररोज शाळेसाठी सटाणा येथे एस.टी. बसने प्रवास करते. नुकत्याच एका प्रवासादरम्यान तिला बसमध्ये एक पाकीट सापडले, ज्यामध्ये रोख रक्कम असल्याचे लक्षात आले. अनेकजण अशा प्रसंगी मोहात येऊन ती रक्कम स्वतःकडे ठेवली असती, मात्र आराध्याने प्रामाणिकपणा दाखवत तो पाकीट सटाणा येथील एस.टी. महामंडळाच्या आगारप्रमुखांकडे त्वरित जमा केले.तिच्या या प्रामाणिक वर्तनाची दखल एस.टी. प्रशासनासह शाळेतील शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनीही घेतली असून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.जिजामाता विद्यालयाच्या वतीने प्राचार्या सौ. संगीता सोनवणे मॅडम, पर्यवेक्षक बाळासाहेब ढेपले सर व दिगंबर पवार सर यांच्या हस्ते कु. आराध्याचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी विद्यालयातील सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कु. आराध्याचे वर्तन इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले असून प्रामाणिकपणासारख्या मुल्यांचा आदर ठेवण्याचा संदेश तिने आपल्या कृतीतून दिला आहे. शाळेच्या वतीने तिचे विशेष अभिनंदन करण्यात आले असून भविष्यात तिला यशस्वी जीवनाची शुभेच्छा दिल्या गेल्या आहेत.
