
सिन्नर (प्रतिनिधी) :- डुबेरे येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात संस्थेचे तालुका संचालक कृष्णाजी भगत यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय मंत्रिमंडळाची निवड लोकशाही पद्धतीने करण्यात आली. मंत्रीमंडळाच्या निवडणुकीचे नियोजन विद्यालयाचे पर्यवेक्षक उल्हास पवार यांनी केले. शालेय विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया माहिती व्हावी या उद्देशाने निवडणूक कार्यक्रम,उमेदवारांनी फाॅर्म भरणे, माघार घेणे, चिन्ह वाटप करणे,शालेय आवारात प्रचार करणे इत्यादी सर्व प्रक्रिया पूर्ण करुन चिठ्ठीद्वारे मतदान घेण्यात आले. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतमोजणी करून ज्या उमेदवाराला जास्त मतदान मिळाले त्याला विजयी घोषित करण्यात आले. याप्रमाणे शालेय मंत्रिमंडळातील पंतप्रधान, उपपंतप्रधान व मंत्रिमंडळातील इतर सदस्यांची निवड करण्यात आली.ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जेष्ठ शिक्षक सोमनाथ पगार,डी.ए.रबडे,रेवणनाथ कांगणे,क्रीडाशिक्षक शिवाजी गुरुळे यांनी परिश्रम घेतले. निवडून आलेल्या मंत्र्यांचा सत्कार विद्यालयात करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक रंगनाथ उगले होते. व्यासपीठावर पर्यवेक्षक उल्हास पवार,सुनिल ससाणे,विद्या ठाकरे,रेखा खंडीझोड, सिमा गोसावी, कचेश्वर शिंदे, कल्पना शिंदे,वरिष्ठ लिपिक राणी शिंदे,रोहिणी भगत आदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शालेय नियमांच्या अधीन राहून आपले काम निष्ठा व प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा संकल्प याप्रसंगी विद्यार्थ्यांनी घेतला .शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी पदाचा सुयोग्य वापर करून शाळेची शिस्त गुणवत्ता व पारदर्शकता अबाधित ठेवण्याचा संकल्प देखील विद्यार्थ्यांनी केला. मुख्याध्यापक उगले यांनी निवडणुकीत सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक करून विजयी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. तसेच शालेय मंत्रिमंडळातील सदस्यांनी शालेय शिस्त, गुणवत्ता वाढीसाठी स्वतः कार्य तत्पर राहावे व शाळेच्या नावलौकिकात भर मिळविण्यासाठी प्रयत्न करावे असे आव्हान मुख्याध्यापक उगले यांनी केले.उपशिक्षक सोमनाथ गिरी यांनी विद्यार्थ्यांना मंत्रिमंडळाचे कार्य सांगून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आभार प्रदर्शन उपशिक्षिका जयश्री गोहाड यांनी केले. शालेय मंत्रिमंडळ पुढील प्रमाणे पंतप्रधान -प्रथमेश गणेश वाजे ,उपपंतप्रधान/ श्रावणी राजेंद्र माळी ,शालेय प्रतिनिधी -आदेश दत्तात्रय वाजे,अर्थमंत्री- स्वरांजली नवनाथ सहाणे, स्वच्छता मंत्री- तन्वी कैलास कुटे, सांस्कृतिक मंत्री- धनश्री संपत माळी , सहलमंत्री – परिणीती अशोक टोचे, अभ्यास मंत्री-मानसी राजेंद्र वारुंगसे, क्रीडामंत्री/आरोग्य मंत्री- ईश्वर संदीप पडवळ. शालेय मंत्रिमंडळाचे अभिनंदन शालेय समितीचे अध्यक्ष नारायण वाजे,उच्च माध्यमिक समितीचे अध्यक्ष विठ्ठलतात्या वामने ,शालेय समितीचे सर्व सदस्य, पालक -शिक्षक व माता-पालक संघ सदस्य आदींनी केले आहे. यावेळी शिक्षक,शिक्षिका,शिक्षकेतर वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.
