
नाशिक:- स्पर्धेच्या युगात माणूस माणसापासून दूर चालला आहे. छोटी वा मोठी घटना घडली तरी आपण मदतीला पुढे जात नाही. मात्र आयुष्यात मला माणूस म्हणून जगायला शिकवणाऱ्या भिडलेल्या माणसांसारखी संवेदनशीलता जपणारी माणसं आज महत्त्वाची वाटतात, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक आणि व्याख्याते संदीप देशपांडे यांनी केले. गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त हुतात्मा स्मारकात आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ उपक्रमात ते ‘भिडलेली माणसं’ या पुस्तकावर बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत सावळीराम तिदमे होते. श्री.देशपांडे पुढे म्हणाले की, माणसांच्या अंगी भावनाशीलता असल्याशिवाय कोणताही माणूस कळत नाही. सामाजिक भावना जपल्या तरच माणसातले मन कळत जाते. त्याच्या अनुभवाची शिदोरी आपल्याला जगण्याची उमेद देते. पु.ल.देशपांडे, विक्रम गोखले, नाना पाटेकर, कुसुमाग्रज, श्रीराम लागू, लक्ष्मीकांत बेर्डे, लता मंगेशकर अशी अनेक भिडलेली माणसं माझ्या साहित्याचा विषय बनले. रक्ताची नातीसुद्धा जेव्हा परकी होतात; तेव्हा बेवारस प्रेतासाठी काम करणारी माणसं त्याच्या कार्यातून चैतन्य निर्माण करतात. भेटलेल्या अनेक माणसांनी खूप काही शिकवले, असेही ते म्हणाले सुहास टिपरे आणि जनार्दन देवरे यांना ग्रंथभेट देण्यात आली. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पवार यांनी सूत्रसंचालन तर माजी आमदार नानासाहेब बोरस्ते यांनी आभार मानले. दरम्यान येत्या शुक्रवारी (४) ‘व-वात्रटिकेचा!’ या पुस्तकावर मनमाड येथील सुप्रसिद्ध कवी प्रदीप गुजराथी ऐसपैस गप्पा करणार आहेत.
