
नाशिक:-(प्रतिनिधी )जन्मदाती आई आणि आयुष्यभर पोसणारी भूमी आपल्या आयुष्याला आकार देत असते. त्यांच्या ऋणातून कधीही मुक्त होता येत नाही. मायमातीशी असलेली बांधिलकी हाच माझ्या कवितेचा गाभा आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी भास्कर देशमाने यांनी केले. गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त हुतात्मा स्मारकात आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या अभिनव उपक्रमात ‘आंबऱ्या झुंबऱ्या’ या पुस्तकावर ऐसपैस गप्पा मारताना ते बोलत होते. साहेबराव उगले अध्यक्षस्थानी होते. श्री.देशमाने पुढे म्हणाले की, ग्रामीण भागातील वास्तव परिस्थिती बदलत आहे. गावगाडा बदलत असताना मायमातीशी घट्ट नातं जपल्याशिवाय गाव, माती, माणसं कळणार नाहीत. तंत्रज्ञान क्रांती झाली; पण शेतकरी आत्महत्या थांबत नाही. ही शोकांतिका आहे. मळ्यातील बैलजोडीशी असलेले नातं हे जिवंत माणसापेक्षा मला अधिक भावतं, असे सांगून त्यांनी पुस्तकातील विविध कविता सादर करून त्यांना मंत्रमुग्ध केले. दतात्रय दाणी आणि गोकुळ आहिरे यांना ग्रंथभेट देऊन सन्मानित करण्यात आले. सुरेश पवार यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.संजय जगताप यांनी आभार मानले. दरम्यान येत्या मंगळवारी (१) मनमाड येथील सुप्रसिद्ध साहित्यिक संदीप देशपांडे ‘भावलेली माणसं’ या गाजलेल्या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करणार आहेत.
