
लहवीत (प्रतिनिधी) गुरुवार दि. २६/०६/२०२५ रोजी सकाळी छ. शाहू महाराज जयंतीनिमित्त अध्यक्ष व पाहुणे म्हणून अनिसचे कार्यकर्ते अरुण घोडेराव यांनी जनता विद्यालय, लहवित येथे छ. शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर व्याख्यान दिले. आरक्षणाचे जनक व समतेचे पुरस्कर्ते म्हणून छ. शाहू महाराजांचे कार्य अनमोल व अविस्मरणीय आहे तसेच सामाजिक न्यायाची जाणिवपूर्वक प्रस्थापना करणा-या शाहू महाराजांचे नाव देशाच्या इतिहासात अजरामर आहे, असे प्रतिपादन अरुण घोडेराव यांनी केले. शेतकरी, विद्यार्थी, महिला, अस्पृश्य यांच्यासाठी छ.शाहू महाराजांनी आपला शाही खजिना उपयोगात आणला व करवीर संस्थानातील शेती, शाळा, वसतिगृह, उद्योग क्षेत्रात पायाभूत कामे व सुविधा केल्या, महाराष्ट्रात शाळा, वसतिगृहांचे जाळे उभारले, असेही त्यांनी स्पष्ट केले.प्रारंभी छ.शाहू महाराजांच्या प्रतिमेला अरुण घोडेराव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला, मुख्याध्यापिका एम एम कसबे, अर्जुन टिळे सर तसेच शालेय समितीच्या स्थानिक मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. काही विद्यार्थी, विद्यार्थीनींनी छ.शाहू महाराज यांच्या जीवनावर भाषणे केली. आभार अर्जुन टिळे सर यांनी मानले. या प्रसंगी शाळेचे शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
