
एक प्रामाणिक व कर्तव्यदक्ष सेवक:-श्री. दत्तात्रय मारुती लोंढे ( वरिष्ठ लिपिक):- यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास” बहुजन हिताय – बहुजन सुखाय ” हे ब्रीदवाक्य घेऊन कर्मवीरांच्या त्याग व समर्पणातून उभी राहिलेली संस्था तसेच कार्यकारी मंडळाचे सन्माननीय पदाधिकारी आणि सन्माननीय संचालकांच्या अविरत प्रयत्नातून नावलौकिकास पात्र ठरलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सिन्नर तालुक्यातील मनेगाव येथील नूतन जवाहर विद्यालयातील वरिष्ठ लिपिक दत्तात्रय मारुती लोंढे हे मविप्र समाज संस्थेतील जवळपास ३२ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून दिनांक ३० जून २०२५ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. रविवार दि.२९ जून २०२५ रोजी त्यांचा सेवापूर्ती सोहळा कार्यक्रम मातोश्री नर्मदा लॉन्स सिन्नर या ठिकाणी आयोजित केला आहे त्यानिमित्ताने…….. सिन्नर येथील सर्वसामान्य विडी कामगार कुटूंबात दत्तात्रय मारुती लोंढे यांचा जन्म ५ जून १९६७ रोजी झाला. त्यांची घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. लहानपणीच वडिलांचे छत्र हरपले होते. आई जानकाबाई यांनी सांभाळ करून वाढविले. त्यांनी आपले चौथी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सिन्नर येथे तर माध्यमिक शिक्षण पूर्वीचे जनता विद्यालय,सिन्नर येथे पूर्ण केले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण सिन्नर येथे झाले. आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे विड्या बांधण्याचे काम करून त्यातून येणा-या पैशातून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले . महाविद्यालयात शिकत असताना अनेक वेळा फी भरण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते .अशावेळी विद्यालयातील तत्कालीन संवेदनशील प्राचार्य आर .डी .पवार व त्यांचे सहकारी यांनी त्यांची फी स्वतः भरून त्यांना शिक्षणास प्रोत्साहन दिले. त्यांनी बी.एस्सी.पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी अप्लाइड कॉम्प्युटर सायन्स कोर्स केला. व्यावसायिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रत्येक व्यक्तीचे ध्येय असते की चांगल्या ठिकाणी नोकरी मिळावी. त्यांना देखील महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रात अग्रगण्य असलेली संस्था मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक या संस्थेत नोकरीची संधी मिळाली.या मिळालेल्या संधीचे त्यांनी सोने केले. अप्लाइड कॉम्प्युटर सायन्स कोर्स करून तासिका तत्वावर अल्प मानधनात नोकरीची सुरुवात त्यांनी सिन्नर महाविद्यालयातून सन १९९२ पासून केली. पूर्वीच्या काळी संगणक शिक्षणाला अतिशय महत्त्व होते. सिन्नर येथील लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयात संगणक शिक्षणाची मुहुर्तमेढ त्यांच्याच काळात झाली. इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना संगणक शिक्षक म्हणून त्यांनी अध्यापन केले आहे. त्यांच्याच काळात विद्यालयात संगणक लॅब सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना संगणकीय शिक्षणाची गोडी त्यांनी लावली होती. फिक्स पे वर संगणक शिक्षक म्हणून त्यांनी काम केले आहे.” संस्था हेच आपले दैवत ” मानून त्यांनी सेवा केली . कधीही स्वतःचा विचार केला नाही . त्यांना शिक्षणाची अत्यंत आवड व इच्छा होती. म्हणून नोकरी करून बीएड तसेच बीपीएड या पदव्या त्यांनी संपादन केल्या. शिक्षक म्हणून काम करत असतानाच संस्थेने त्यांची सन २००१ मध्ये जनता विद्यालय, तिसगांव ता- दिंडोरी या विनाअनुदानित विद्यालयात कनिष्ठ लिपिक म्हणून नेमणूक केली. या विद्यालयात काम करीत असताना संस्थेने त्यांना मध्यवर्ती कार्यालय कामकाजात बोलविले . मध्यवर्ती कार्यालयात दोन ते तीन वर्षे काम केल्यानंतर त्यांची बदली न्यू इंग्लिश स्कुल नांदगाव या शाळेत झाली. परंतु या गोष्टीचा आपल्या कामकाजावर कोणताही परिणाम होणार नाही याची काळजी त्यांनी घेतली. न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव या शाळेत त्यांनी पाच वर्ष कामकाज केले त्यांचा स्वभाव अत्यंत मितभाषी, शांत, परिश्रमी, कर्मनिष्ठ , मनमिळावू, एकनिष्ठ , परोपकारी व्यक्तिमत्व असलेला आहे. त्यांच्यावर सोपविलेली जबाबदारी निष्ठेने पूर्ण करण्यात नेहमीच अग्रेसर असायचे. त्यानंतर त्यांची बदली जाखोरी या विद्यालयात झाली. या विद्यालयात कामकाज करीत असतानाच फक्त आठच महिन्यात त्यांची बदली पुन्हा एकदा सिन्नर तालुक्यातील जनता विद्यालय सोनांबे या विद्यालयात झाली. परंतु या बदली आदेशाबरोबरच त्यांना संस्थेच्या मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयात कामकाज करण्यासाठीचा आदेश देण्यात आला . मविप्र संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयात कामकाज करण्यास अनेक सेवक इच्छुक असतात. परंतु लोंढे यांनी कोणताही प्रयत्न केला नाही .परंतु त्यांच्या चांगल्या कामकाजाचा विचार करून संस्थेने दुस-यांदा त्यांना मध्यवर्ती कार्यालयात काम करण्याची संधी दिली. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे तत्कालीन सरचिटणीस डॉ.वसंतराव पवार साहेब, श्रीमती नीलिमाताई पवार तसेच सध्याचे विद्यमान सरचिटणीस ॲड.नितीनभाऊ ठाकरे साहेब तसेच संस्थेचे विद्यमान संचालक कृष्णाजी भगत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज अखेर म्हणजे सेवानिवृत्तीपर्यंत जवळपास त्यांनी अठरा वर्ष मध्यवर्ती कार्यालयात कामकाज केले. कामकाज करीत असताना त्यांना संस्थेचे तत्कालीन शिक्षणाधिकारी श्री. आर.व्ही. तासकर, डॉ. एस. के. शिंदे सर तसेच विद्यमान शिक्षणाधिकारी डॉ.भास्करराव ढोके सर यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले .संस्थेच्या शिस्त, गुणवत्ता व पारदर्शकता या त्रिसूत्रीचा वापर करून त्यांनी कामकाज केले.एकनिष्ठता व प्रमाणिकपणाचे फळ त्यांना मिळाले. निःपक्षपातीपणे कामामुळे त्यांना मध्यवर्ती कार्यालयात सेवा करण्याची संधी मिळाली. संस्थेतील सेवकांची अनेक कामे जिल्हा परिषदेतून करून आणण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यांना शिक्षक म्हणून काम करण्याची खूप इच्छा होती .परंतु त्यांचे स्वप्न अधुरे राहिल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे . त्यांनी हार मानली नाही .परंतु आहे त्यात समाधान मानून त्यांनी आपले कामकाज केले आहे. असं हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व लाभलेल्या श्री.लोंढे यांनी शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात वावरतांना मोठ्या प्रमाणात मित्रपरिवार गोळा केला आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे त्यांच्या अर्धांगिनी अर्थात पत्नीचे योगदान असते.भाऊसाहेबांच्या सहचारिणी सौ. विजया याही त्यांच्या पाठीशी भक्कम उभ्या राहिलेल्या आहेत. त्यामुळे त्यांना हा शैक्षणिक प्रवास करणे शक्य व सुलभ झाले.त्यांना वैभव हा एकलूता एक मुलगा असून त्याने इंग्रजी विषय घेऊन एम.ए.केले आहे. तसेच तो नेट,सेट परीक्षा पात्र असून सध्या बी.एड करीत आहे. त्यांचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतिशय महत्वाचे आहे. सतत आनंदी व मितभाषी असलेल्या श्री.लोंढे यांना सेवानिवृत्ती नंतरचे आयुष्य अगदी सुखासमाधानाचे ,आरोग्यदायी भरभराटीचे जाओ. दीर्घायुष्य लाभो .हीच ईश्वरचरणी मनोकामना ! तुमची सेवा आणि समर्पण सदैव स्मरणात राहील .तुम्हाला सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा! तुमच्या पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा! शब्दांकन-श्री.सोमनाथ गिरी (सर ) जनता विद्यालय, डुबेरे ता-सिन्नर जि- नाशिक
