
नाशिक:-(प्रतिनिधी ) दैनंदिन जीवन जगत असताना संकट काही पाठ सोडत नाहीत. असे आयुष्यात अनेक संघर्ष वाट्याला आले, हे संघर्ष म्हणजेच ‘जीवनाची शाळा’ हा काव्यसंग्रह होय, असे प्रतिपादन कवयित्री सीमाराणी बागुल यांनी केले.
(गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त हुतात्मा स्मारकात आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ उपक्रमात ‘जीवनाची शाळा’ या काव्यसंग्रहावर त्या बोलत होत्या. कवयित्री शुभांगी माळी अध्यक्षस्थानी होत्या.
सीमाराणी बागुल पुढे म्हणाल्या की, आयुष्याचा प्रवास करताना अनेकवेळा निराशा आणि कटू प्रसंग आले. पण न डगमगता यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. जीवनाची शाळा खऱ्या अर्थाने होत असताना जगण्याची हिंमत ठेवून शून्यात न पाहता मनातील आशा आणि उमेद घेऊन जगण्याच्या वाटा शोधत राहिले. त्यातूनच कविता निर्माण झाल्या. आयुष्याच्या मार्गावरून चालताना या संग्रहातील कवितांनी मला भविष्याच्या वाटचालीचे स्वप्न दाखवले, असेही त्या म्हणाल्या.
युवाकवी माणिकराव गोडसे आणि ज्येष्ठ साहित्यिक सुहास टिपरे यांना ग्रंथभेट देण्यात आली. सुरेश पवार यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. तेजस्विनी कदम यांनी आभार मानले. दरम्यान येत्या मंगळवारी (दि.३ जून) रोजी ‘कोळवाडा’ या पुस्तकावर डॉ.गोपाळ गवारी ऐसपैस गप्पा करणार आहेत.
