
सिन्नर (प्रतिनिधी)गेल्या अनेक दिवसांपासून सिन्नरला सुरू असलेली निमाणी(नाशिक) ते सिन्नर प्रवासी सिटीलिंक बससेवा नेहमी वादाच्या भोवऱ्यात सापडलेली होती. बसचालक व वाहक यांच्यातील वाद,अनेकदा ड्रायव्हरला झालेली मारहाण तर कधी सिटी लिंक बसच्या चालक वाहक यांची मनमानी अशा अनेक कारणांनी काही काळ ही बससेवा बंद होती.ती पूर्ववत सुरू होण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न झाले.एक मे ला कानडी मळ्यातून माजी नगरसेविका शीतल कानडी,सुनील कानडी तसेच विजयनगरच्या ज्येष्ठ नागरिक यांच्या मदतीने बससेवा सुरू झाल्यामुळे नियमित प्रवास करणाऱ्या विद्यार्थी,नोकरदार,कर्मचारी व प्रवाशांची गैरसोय दूर झाली, त्याचा सर्वांना आनंद झाला. परंतु हा आनंद फार काळ टिकला नाही. कानडी मळ्यात ,काल परवा बससेवा ज्या ठिकाणाहून सुरू झाली व ज्या जागेत बस थांबत होत्या,त्या जागा मालकाने बांधकाम करण्याच्या बहाण्याने या ठिकाणी बस उभ्या करता येणार नाही असा पवित्र घेतला.त्यामुळे पुन्हा बससेवा अडचणीत आली. एक दोन दिवस प्रवासी सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांची पुन्हा गैरसोय झाली.यातून कायम स्वरुपी मार्ग काढण्यासाठी विजयनगर मधील प्रभाग दोनच्या माजी नगरसेविका शीतल कानडी व त्यांचे पती माजी पंचायत समिती सदस्य सुनील कानडी यांनी स्वमालकीची जागा देऊ केली.सिटीलिंक चे अधिकारी सुरेश कातकाडे यांना आपल्या मालकीचे कागदपत्र दाखवून या ठिकाणाहून बससेवा सुरू करण्यासाठी परवानगी दिली.कानडी दांपत्याच्या दातृत्वाने अधिकारी व उपस्थित ज्येष्ठ नागरिक भारावून गेले. त्यांच्या योगदानामुळे यापुढे बससेवा अखंडित व सुरळीत होण्याची हमी मिळाल्यामुळे प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.यावेळी विजयनगर येथील ज्येष्ठ नागरिक ग्राहक पंचायतचे पदाधिकारी दत्ता शेळके,रवींद्र घोगे,राजेंद्र घोगे, मोहन भुतडा,डॉ.श्यामसुंदर झळके,सदाशिव निकम,सिटी लिंकचे व्यवस्थापक स्वप्नील सांगळे,अधिकारी सुरेश कातकाडे, अरुण कराड,चालक राकेश पाटील,वाहक दीपाली सोमवंशी आदी उपस्थित होते.
