
नाशिकरोड:-( प्रतिनिधी )येथील शिखरेवाडीतील स्वानंद ज्येष्ठ नागरिक संस्था आणि मनोवेध डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने काचुर्ली धरण, त्र्यंबकेश्वर येथे “वर्षाऋतू काजवा महोत्सव” सहल मोठ्या उत्साहात संपन्न झाली. पर्यावरण आणि निसर्गचक्र ह्या उद्देशाने सहलीची आखणी करण्यात आली. संस्थेच्या सर्व ज्येष्ठ सभासदांनी मोठ्या उत्साहात दुपारी बसने त्र्यंबकेश्वरच्या दिशेने प्रस्थान केले. तेथून जव्हार रस्त्याने अंबोली गावाच्या अलीकडून वळसा घेऊन काचुर्ली धरणाच्या पायथ्याशी उगले यांच्या दुर्ग राज ॲडव्हेंचर निसर्गमयी कॅम्प रिसाॅर्टमध्ये आले. गेल्या पंधरा वर्षात त्यांनी माळरानाचे रूपांतर वनराईत केल्याचे सांगत निसर्ग जोपासण्याची विनंती केली. संध्याकाळचे परिसर दर्शन विलोभनीय होते. अथांग जलाशय आणि हिरवीगार वनराई प्रत्येकास उल्हसित करीत होता. परिसर दर्शनचा आनंद घेतल्यावर प्रत्येकाने गरमागरम अल्पोपहाराचा आस्वाद घेतला. अमोल कुलकर्णी यांनी दृकश्राव्य माध्यमातून सगळ्यांना निसर्गाच्या विविध पैलूंचे दर्शन घडवले. अंधारात लुकलुकणारे काजवे सर्वांनी मनाच्या कोपऱ्यात बंदिस्त केले. स्नेहभोजनानंतर काजवा ध्यानाची प्रगत अवस्था सगळ्यांनाच एक निरव शांततेची अनुभूती देऊन गेली. सोबत काजव्या़ंच्या मनमोहक लुकलुकण्याचा विलोभनीय अनुभव घेता आला. संदीप मुळाणे यांनी निशा जाधव यांच्या साथीने गीत सादर करत सगळ्यांना भुरळ घातली. सहलीची आखणी, नियोजन, व्यवस्थापन अमोल कुलकर्णी, राम कुलकर्णी, वैदेही कुलकर्णी, सचिव अविनाश गोसावी, सुनंदा गोसावी, परमेश्वर चिंतकिंदी आदींनी केले. अपर्णा गरुड, सुधा डमरे, मंगल शिंदींकर, पूजा चिंतकिंदी, अर्चना सहस्त्रबुद्धे, वृंदा पिंपळखरे, मुग्धा कुलकर्णी, रेखा नाशिककर, स्मिता जोशी, शोभना व्यवहारे, दीपाली भिंगारकर, दिलीप भिंगारकर, नरेश कुलकर्णी, ठका शिंगोटे, विजय गीत, मालती दाभाडे, अरुणा ओक आदींच्या सहभागाने ही सहल अधिक फुलली आणि बहरली.फोटोओळी:-स्वानंद ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या काचुर्ली धरण, त्र्यंबकेश्वर येथील “वर्षाऋतू काजवा महोत्सव” सहलीप्रसंगी निसर्गाच्या सानिध्यात ज्येष्ठ नागरिक.
