
सिन्नर (प्रतिनिधी)काल रविवारी (ता.२५) सिन्नर बसस्थानकाचा स्लॅब मुसळधार अवकाळी पावसामुळे कोसळला. शिवशाही बस व एका अल्टो कारचे मोठे नुकसान झाले.सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.सिन्नरमध्ये रविवारी वरुणराजाने चौफेर फटकेबाजी करून सुमारे दोन तास धुवाधार पावसाने चांगलेच धुतले.शहर व उपनगरात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले.सर्व रस्ते जलमय झाले, नाशिक पुणे मार्गावर,बसस्थानक नजीक वाहतुकीची कोंडी झाली. विजेच्या कडकडाटाने व वादळी पावसाने मोठे नुकसान झाले.दरम्यान हायटेक बसस्थानकाची चर्चा मात्र चांगलीच रंगली.अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी बसस्थानकला भेट देऊन नुकसानीची माहिती घेतली.कोणतीही जीवित हानी न झाल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.राज्यात हायटेक समजल्या जाणाऱ्या बसस्थानकाच्या निकृष्ट बांधकामाची निःपक्षपातीपणे चौकशी होऊन कारवाईची मागणी करण्यात आली.

राज्याचे कृषीमंत्री ॲड.माणिकराव यांनी झालेल्या दुर्घटेनेबद्दल हळहळ व्यक्त करून घटनेची माहिती घेतली.सिन्नर आगाराचे प्रमुख हेमंत नेरकर,सिन्नर नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रितेश बैरागी सह अनेक अधिकाऱ्यांनी बसस्थानकाची पाहणी करून सूचना दिल्या.दरम्यान स्लॅब दुरुस्तीची जबाबदारी एसटी महामंडळाने घेतल्याची माहिती आगारप्रमुख नेरकर यांनी दिली.यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे (श.प.गट) नेते उदय सांगळे,तालुका प्रमुख ॲड.संजय सोनवणे,नामदेव कोतवाल तसेच पदाधिकारी यांनी बसस्थानकाची माहिती घेऊन धोकादायक भाग काढून त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली.लवकरात लवकर बसस्थानक प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्याची विनंती केली.कालच्या दुर्घटनेचा प्रवाशांवर परिणाम झाला असून,आवारात वर्दळ कमी दिसली.गाड्यांचे वेळापत्रक कोलमडल्याचे दिसले. संपूर्ण बसस्थानक रिकामे करून, आवारात एसटी बसेस उभ्या केल्याच्या दिसल्या.प्रवाशांची पावसाने फजिती झाली.निवाऱ्यासाठी कोणतीच सुविधा नसल्याचे तसेच प्रवाशांची तारांबळ उडाल्याचे चित्र दिसले.
