
नाशिक:-(प्रतिनिधी )आमचा विदर्भ म्हणजे सर्वार्थाने अभावग्रस्त भाग. याच भागात कष्टकऱ्यांच्या होणाऱ्या हालअपेष्टा आणि तिथली एकूण परिस्थिती यावरचं प्रांजळ भाष्य माझ्या ‘काहून’ या कवितासंग्रहात मांडण्याचा प्रयत्न मी केला, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी रवींद्र दळवी यांनी केले.
गिरणा गौरव प्रतिष्ठानने हुतात्मा स्मारकात आयोजित केलेल्या ‘पुस्तकावर बोलू काही’ या उपक्रमात ‘काहून’ या आपल्या वऱ्हाडी बोलीतील काव्यसंग्रहावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी माणिकराव गोडसे होते.
कवी रवींद्र दळवी पुढे म्हणाले की, वैदर्भीय ग्रामीण भाषेत लिहिलेल्या या कविता ग्रामीण जीवनावर भाष्य करतात. विदर्भातील शेतकऱ्यांच्या होणाऱ्या असंख्य आत्महत्या कविमनाला अस्वस्थ करतात. त्याचबरोबर कोरोना काळातील अत्यंत तीव्र होणाऱ्या वेदना कवितेमधून मांडता आल्या. माझ्या कवितेची जडणघडण दत्त संप्रदायातील महापूजेवेळी होणाऱ्या भक्तिसेवा परंपरेने झाली, असेही ते म्हणाले. मधुकर गिरी यांनी सूत्रसंचालन केले तर ॲड.मिलिंद चिंधडे यांनी आभार मानले.
