
नाशिकरोड:-( प्रतिनिधी ) पळसे गावचे भूमिपुत्र सोमनाथ आगळे यांनी आपल्या आयुष्यात अनेक माणसं जोडली. तीर्थयात्रेला असताना त्यांचे निधन झाले, हा दैवयोग असावा. त्यांनी अध्यात्म आणि संस्कार यांची केलेली जपवणूक आजच्या पिढीला दिशादर्शक आहे, असे उदगार ज्येष्ठ कीर्तनकार भगूररत्न हभप गणेश महाराज करंजकर यांनी काढले. सीताई लॉन्समध्ये सोमनाथ दामू आगळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कीर्तनाचे आयोजन आगळे परिवाराने केले होते. संत तुकाराम महाराजांच्या ‘धन्य ते संसारी, दयावंत जे अंतरी…’ या अभंगावर निरूपण करताना गणेश महाराज बोलत होते. ते पुढे म्हणाले की, सोमनाथ आगळे एक वर्षाचे असताना पितृछत्र हरपल्यानंतर मातेने संपूर्ण परिवाराला घडवले. वयाच्या विसाव्या वर्षी पळसे ग्रामपंचायतीत लिपिक म्हणून काम केल्यानंतर नाशिक जिल्हा परिषदेत त्यांची पदोन्नती झाली. नोकरीवर असतानाच त्यांचे तीर्थयात्रेला गेले असताना निधन झाले. पळसे ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन म्हणून त्यांच्या पत्नी शैला यांनी काम बघितले. ज्येष्ठ बंधू हभप दशरथ आगळे तसेच उच्च विद्याविभूषित चिरंजीव सुनील आणि अनिल या दोन्ही मुलांनी त्यांचा वारसा संपन्नपणे पुढे चालवला आहे. याचा धागा पकडत गणेश महाराज यांनी आजच्या पिढीने संतांचे विचार अंगीकारावे, असेही आवाहन केले. त्यांना गायनाचार्य हभप निळोबा महाराज सूर्यवंशी, प्रकाश महाराज सुरवसे, सुदाम दादा धोंगडे, मृदुंगाचार्य शुभम महाराज, विणेकरी समाधान गायधनी यांच्यासह पंचक्रोशीतील भजनी मंडळांनी उत्कृष्ट साथसंगत केली. पळसे गावच्या वतीने ज्येष्ठ कामगार नेते अशोक गायधनी यांनी श्रद्धांजली अर्पण केली. जिल्हाभरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांसह कीर्तनाला पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोमनाथ आगळे यांचे चिरंजीव सुनील आगळे यांनी अर्थासहीत तयार केलेला हरिपाठ आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ उपस्थितांना भेट दिला. सोमनाथ आगळे यांची नात युवराज्ञी सुनील आगळे हिने पसायदान सादर केले. पळसे येथील ग्रामाभिमान मंच आणि आगळे परिवाराच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत करण्यात आली.
