
सिन्नर (प्रतिनिधी) – 18 मे हा दिवस जगभरात जागतिक मासिक पाळी दिवस म्हणून साजरा केला जातो तरी मासिक पाळी स्वच्छतेबाबत महिलांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने 18 मे रोजी सिन्नर येथे भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. महामित्र, सररोजदेवी फाउंडेशन, CYDA इंडिया , युथएड फाउंडेशन, सक्षम कन्या विकास संस्था, मोलकरीण घरेलू कामगार सभा, असंघटित कामगार संघटना, तसेच साऊ एकल महिला समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ही रॅली पार पडली.रॅली मध्ये 50 महिला युवक युवतींनी सहभाग घेतला

. रॅलीचे उदघाटन माजी नायब तहसीलदार आदरणीय दत्ता वायचाळे यांच्या हस्ते क्रांतीज्योती महात्मा फुले यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून व घोषणा देऊन करण्यात आले.महिलांमध्ये मासिक धर्माविषयी माहिती पोहोचवण्यासाठी CYDA व YouthAid Foundation यांच्या कार्यकर्त्यांनी एस.टी. बसस्थानक परिसरात प्रभावी पथनाट्य सादर केले. मासिक पाळी, स्वच्छता, वापरण्यात येणारे साहित्य याबाबत समाजप्रबोधन करण्यात आले.

रॅली बसस्थानकातून सुरु होऊन मुख्य गल्लीतून छत्रपती शिवाजी महाराज चौक गाठण्यात आली. येथे महिलांनी व पथनाट्य सादर करणाऱ्या मुली व मुलांनी आणि यांनी घोषणांनी उपस्थितांमध्ये उत्साह निर्माण केला. “मासिक पाळी सुपर पाळी, एक दोन तीन चार – मासिक पाळीचा जयजयकार”, “मासिक पाळीत महिलांना आराम मिळालाच पाहिजे” अशा घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले.यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी उपस्थित महिलांना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले.मासिक पाळी दरम्यान स्वच्छता राखणे, pH स्तराचे महत्त्व, प्लास्टिक पॅडऐवजी कॉटन पॅड वापरण्याचे फायदे याविषयी विद्याताई गडाख यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात यूथ ऐड च्या सेंटर हेड मनीषा भालेराव, प्रोजेक्ट कॉर्डिनेटर अविनाश सोनवणे सहकारी शीतल पाटील ,पथनाट्य टीम मल्हारी साळवे (एकल महिला समिती), वनिता कोकाटे, वर्षा लगड (सक्षम कन्या विकास संस्था), विद्याताई गडाख (सरोजदेवी फाउंडेशन), उषा रोकडे (असंघटित कामगार संघटना), शोभा अहिरे (घरेलू कामगार सभा) तसेच विविध संस्थांच्या कार्यकर्त्या व महिलांचा मोठा सहभाग होता.
