
उत्कृष्ठ वाचक पुरस्कार-२०२५’ वितरण सोहळ्याप्रसंगी सर्वोत्कृष्ट वाचक पुरस्कारार्थी समवेत मविप्र सभापती बाळासाहेब क्षीरसागर, प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे, शा. व्य. समिती अध्यक्ष डॉ. उत्तम डेर्ले, प्रा दिपाली शेंडे आदी
निफाड (प्रतिनिधी ) कोणत्याही संकटांना, समस्यांना धैर्याने सामोरे जाण्याचे बळ पुस्तकेच आपल्याला देत असतात. आधुनिक काळामध्ये विविध मनोरंजनाची साधने उपलब्ध झाल्या कारणाने वाचनाकडे दुर्लक्ष होत चालले आहे. तंत्रज्ञानाच्या आधीन न होता प्रत्येकाने नियमित वाचन करण्याची गरज आहे. माणूस म्हणून जगतांना विवेक भावना जपता आली पाहिजे. छोटे छोटे परंतु चांगले विचार आत्मसात करता आले पाहिजेत आणि या गोष्टी वाचनातूनच शक्य होऊ शकतात. असे मत मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी व्यक्त केले. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे निफाड येथील कर्मवीर गणपत दादा मोरे महाविद्यालय येथे आयोजित ‘उत्कृष्ठ वाचक पुरस्कार-२०२५’ वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष डॉ. उत्तम डेर्ले, अशोक वडघुले, जानकीराम धारराव, सुधाकर कापसे, डॉ. प्रवीण ढेपले, प्रा. अभय वडघुले, डॉ. सुसान लॉरेन्सिया, प्रा. योगेश कडलग, डॉ. रोहिदास शिंदे, ग्रंथालय प्रमुख श्रीमती दिपाली शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते. बाळासाहेब क्षीरसागर पुढे म्हणाले की,माणसाला डोळस वृत्तीने समाज, निसर्ग, पुस्तके वाचता आली पाहिजेत. जीवनात पुस्तकांचा सहवास लाभला तर माणूस समृध्द बनतो. आई-वडील गुरुजनांसोबतच पुस्तके माणसाला वैचारिक व संस्कारक्षम बनवितात. मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे म्हणाले की, महाविद्यालयात वाचनसंस्कृतीची परंपरा वृद्धिंगत व्हावी, वाढावी यासाठी महाविद्यालयात विविध उपक्रम राबविले जातात. उत्कृष्ट वाचक पुरस्कार देण्यातून विद्यार्थी,सहकारी यांना अधिक वाचन करण्यास प्रेरणा मिळून वाचन सवय विकसित व्हावी हा उद्देश्य असल्याचे म्हटले. लेखक समाजातील समस्या, दुख, वेदना व व्यथा आपल्या लेखणीतून मांडत असतो. त्यामुळे आपल्या जाणीवा समृद्ध करण्यासाठी अधिकाधिक वाचन तरुण पिढीने करावे असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. उत्कृष्ट वाचक पुरस्कार कु. धनश्री वाघचौरे, कु. सूरज भोसले या विद्यार्थ्यांना प्राप्त झाला तर वरिष्ठ विभाग प्रा.नरेश सोनटक्के, कनिष्ठ विभाग श्रीमती प्रतिभा वाटपाडे, वरिष्ठ लिपिक रघुनाथ रायते, शिपाई समाधान फडताळे, या सेवकांना उत्कृष्ठ वाचक पुरस्कार २०२५ ने सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाचे संयोजन आणि सूत्रसंचालन डॉ. महेश बनकर यांनी केले तर आभार प्रा. चेतन कुंदे यांनी मानले.
