परीक्षण -प्रशांत वाघ (पॅसिफिक टायगर)संपर्क – ७७७३९२५००० (तीन सत्ते एकोणचाळीस पंचवीस हजार)


काव्यझुला नांदगाव जि नाशिक येथील कवी प्रा. सुरेश नारायणे यांचा काव्याझुला हा कवितासंग्र्ह नुकताच वाचनात आला आणि कवी मंगेश पाडगावकर यांची आठवण झाली. त्यांची झुला ही कविता शिकवत असतांना गुरुजी तल्लीन होऊन जायचे अगदी तालासुरात झुले बाई झुला माझा झुले बाई झुला हे गाऊन म्हणत असे. अशाच झुल्यावर झुलणाऱ्या कवितेच्या प्रांतात झोका घेणारे कवी प्रा. सुरेश नारायणे यांच्या काव्यझुला या कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ क्षणभर न्याहाळले आणि यातून काही अर्थ निघतात का याचा विचार केला. अतिशय अर्थपूर्ण असलेले हे मुखपृष्ठ मनाला भावले .काव्यझुला या कवितासंग्रहाच्या मुखपृष्ठावर एक अधांतरीत झोका दाखवला आहे, लेखनीच्या (पेनाच्या) दोन्ही बाजूला दोरी बांधलेली, त्या लेखनीवर तीन पुस्तके आणि त्यावर एक नाजूक फुलपाखरू बसलेले आहे, ज्याप्रमाणे झुल्याची दोरी झुकलेली आहे त्याचप्रमाणे कवितासंग्रहाचे शीर्षकातील झुला शब्द झुकता दाखवला आहे. मुखपृष्ठचित्रकार विष्णू थोरे यांनी अतिशय कल्पकतेने रंग भरलेल्या मुखपृष्ठातून अतिशय गर्भित असा अर्थ मला जाणवला आहे. काव्यझुला या कवितासंग्रहाच्या मुखपृष्ठावर एक झोका अधांतरीत दाखवला आहे याचा अर्थ असा की, समाजामध्ये जगायचे असेल तर माणसाने स्वतःच्या हिमतीवर जगले पाहिजे, कुणाचा आसरा घेऊन, कुणाचा आधार घेऊन समाजात वावरू नये. ज्याप्रमाणे लेखणीवर पुस्तकाचा भार दाखवला आहे त्याचप्रमाणे आयुष्यात येणाऱ्या सुखदुःखाचा भार सांभाळून जगता आलं पाहिजे. असा अर्थ मला यातून भावला आहे. काव्यझुला या कवितासंग्रहाच्या मुखपृष्ठावर जी लेखनी दाखवली आहे ती लेखनी म्हणजे ज्ञानाचे प्रतिक आहे, माणसाच्या जीवनात लेखनीला खूप महत्व आहे. बालपणी पाटीवर पेन्सिलने गिरवलेले ग म भ न पुढे हातात लेखनी घेऊन जगाला सुंदरतेचा, समानतेचा, माणुसकीचा, विज्ञानाचा मंत्र लिहून समाजात बदल घडवून आणल्याचे आपण पाहिले आहे. याच लेखनीने संत ज्ञानेश्वरांनी जगाच्या कल्याणासाठी अध्यात्मातून विज्ञानाचे गूढ उकलणारी ज्ञानेश्वरी लिहिली , संत तुकोबारायांनी जगाला तत्वज्ञान शिकविणारी गाथा लिहली आणि जगाला समता , बंधुता , स्वातंत्र्य आणि न्याय मिळवून देणारी संहिता लिहून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान दिले या तीन संदर्भाच्या अनुषंगाने झुल्यावर तीन पुस्तके ठेवलेली असावी असा अर्थ मला भावला आहे आणि या तीन पुस्तकांच्या बळावर आज जगाचा कारभार चालू आहे असे मला वाटते.वाचाल तर वाचाल हे अतिशय अर्थपूर्ण विधान माणसाला शिक्षणाचे महत्व पटवून देणारे आहे. पुस्तके वाचल्याने मस्तक सुधारते आणि ज्याचे मस्तक सुधारते तो इतिहास घडवतो हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे प्रत्येकाने पुस्तकं वाचली पाहिजे. त्यातून ज्ञान मिळते, आणि ज्ञान कधी वाया जात नाही या अर्थाने मुखपृष्ठचित्रकाराने अतिशय कल्पकतेने मुखपृष्ठावर वरील संदर्भ घेऊन पुस्तके दाखवली असावीत असे मला वाटते. ज्ञान मिळविण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. चांगले ज्ञान सहजासहजी मिळत नाही त्याला वाचनाची जोड हवी असते. आणि ज्याला ज्ञान प्राप्त झाले त्याने त्या ज्ञानाचा उपयोग जगाच्या कल्याणासाठी केला पाहिजे. ज्ञान हे मिळवायला कठोर आहे पण जतन करायला फुलपाखरासारखे नाजूक आहे. त्या ज्ञानाला जपले पाहिजे. ज्ञानाचा अहंकार झाला की माणसाचा विनाश अटळ आहे. म्हणून ज्ञान हे फुलपाखरासारखे नाजूक असते त्याला जपले पाहिजे असा गर्भित अर्थ मला मुखपृष्ठावर दाखवलेल्या फुलपाखरात दिसून आला. कवी प्रा सुरेश नारायणे हे स्वच्छंदी मनाचे आहेत, त्यांच्या कविता झुल्याप्रमाणे झोका घेणाऱ्या आहेत. आई, बाप, निसर्ग, मानवता, समाज, अध्यात्म, राष्ट्रप्रेम, देशभक्ती, स्त्रीसन्मान अशा विविध विषयांच्या झुल्यावर बसून झुलणाऱ्या आहेत. त्यांच्या कविता समाजाला संदेश देणाऱ्या आहेत. आई घेऊ दे गं जन्म या कवितेत स्त्रीभृणहत्या करू नका असा संदेश देतांना लिहतात की – मुल-मुली गं समान, दिवा वंशाचा मुलगा, होई आधार मुलगी, संदेश जगाला सांगाबापाविषयी कवीच्या मनात आस्था आहे, बाप प्रत्येकाला हवाहवासा वाटतो म्हणून कवी म्हणतात की – शिस्तबद्ध बाप माझा, हवाहवासा बाप माझा. कवी निसर्गाशी , या मातीशी नाते जोडून आहे कवीला मातीची ओढ आहे म्हणून मातीची ओढ या कवितेत म्हणतात की – माझ्या मातीची गोडी, मला वाटते अवीट I दूरवर असता मला, तिची येते आठवण. कवी मानवतेचे पुजारी आहेत माणुसकी धर्म पाळणारे आहेत आणि म्हणूनच ते जपा माणुसकी या कवितेत लिहतात की – माणुसकीचा रे पाळू, धर्म आपण सगळे, सुख दुसऱ्याचे पाहू, दुःख सारू रे सगळे. कवी समाजात वावरतांना प्रत्येकाने संस्कारक्षम असले पाहिजे असा आग्रह धरतात. त्यांच्या संस्कार कवितेत लिहतात की- सुखी जीवनाचा मंत्र, जपू आपण ते सारे, करू अनुकरण त्यांचे घडू संस्कारांनी खरे. माणसाने स्वानंदासाठी कुठेतरी मन गुंतवले पाहिजे , जीवनात काही अनुभव घ्यायचे असतील तर एक तरी वारी अनुभवावी यात सर्वधर्म समभावाने वारकरी एकत्र येतात आणि म्हणून कवी म्हणतात की – जाती पातीचा रे नसे, कोणताही भेदभाव, टाळ वाजवी रे सारे, तोच भक्ताचा मेळावा. स्त्री ही साऱ्या जगाची जननी आहे तिचा आदर केला पाहिजे .स्त्री शक्तीचा जागर केला पाहिजे अशा अर्थाने कवी जागर स्त्रीशक्तीचा कवितेत म्हणतात की – तुझा तिन्ही लोकी डंका, आई तूच खरी माता. तूच आम्हा तारी-मारी , तूच असे पालनकर्ता. हल्ली देशात लबाडांचे राजकारण चालू आहे भोळीभाबडी जनता चिरीमिरी घेऊन बिनकामी लोकांना मतदान करीत आहेत ही चीड मनात घेऊन कवी आजची लोकशाही या कवितेत लिहतात की – जनताच मात्र भोळी मतदान करी , पैशाच्या लोभापायी हक्काचे दान करी, लबाडांची खोगरभरती उद्या मारी, जनता भोळी मात्र गप्पाच मारी. अशा विविध विषयांवर कवी प्रा सुरेश नारायणे यांच्या कविता झोका घेततांना दिसतात.काव्यझुला या कवितासंग्रहात एकूण ८६ कविता असून सर्व कविता सामाजिक संदेश देणाऱ्या आहेत. प्रसिद्ध मुखपृष्ठचित्रकार विष्णुजी थोरे यांनी अतिशय कल्पकतेने या कलाकृतीसाठी मुखपृष्ठ सजवून एक नवी ओळख करून दिली आहे. मनमाड येथील सिद्धी प्रकाशन यांची या कवितासंग्रहाचे प्रकाशन करून वाचकांच्या हाती सोपविले आहे. कवी प्रा. सुरेश नारायणे यांना पुढील कलाकृती निर्मितीसाठी खूप खूप शुभेच्छा.
प्रशांत वाघ (पॅसिफिक टायगर)संपर्क – ७७७३९२५००० (तीन सत्ते एकोणचाळीस पंचवीस हजार)कलाकृती परिचय:कलाकृती – कविता : काव्यझुला साहित्य प्रकार – काव्यसंग्रह कवी – प्रा. सुरेश नारायणे कवीचा संपर्क क्रमांक -९९६०३ ३०४३८प्रकाशक : सिद्धी प्रकाशन- मनमाड मुखपृष्ठचित्रकार – विष्णू थोरे, चांदवड
