
नाशिक:-( प्रतिनिधी )आदिवासी भागाने जगाला विविध साधनसामुग्री दिली असून आदिवासी भागातील लोकच खरे निसर्गपूजक आहेत. जल, जंगल आणि जमीन ही त्रिसूत्री म्हणजे आदिवासींचे प्राण आहेत. निसर्गाचे रक्षण करणाऱ्या आदिवासी बांधवांनी आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन शिकवला आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध आदिवासी साहित्यिक देवदत्त चौधरी यांनी केले. गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने हुतात्मा स्मारकात आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ उपक्रमात ‘पळसचोंड’ या पुस्तकावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ गझलकार प्रा. निशांत गुरू होते. श्री.चौधरी पुढे म्हणाले की, कोरोनाने लोकांना कॉरन्टाईन, सॅनेटाईझ शब्द शिकवले. पण हजारो वर्षांपासून आदिवासी माणूस हे पाळतो. एखाद्या व्यक्तीचे निधन झाले तर त्याच्या अंगाला हळद लावली जाते. ते यासाठी की, त्याला जर काही आजार असेल तर तो इतरांना होऊ नये. तो माणूस दहा दिवस कुठेही जात नाही म्हणजेच स्वतःला तो कॉरन्टाईन करून घेतो. शेणाने सारवणे हे त्याचे सॅनेटाईझ. आदिवासी माणसाला आहाराचे पूर्ण ज्ञान असल्यानेच तो रानभाज्या खाऊन आजारापासून कोसोदूर राहतो. पुस्तकातून आदिवासी भागातील यथार्थ चित्रण मी केलं आहे, असेही ते म्हणाले. प्रा.सुभाष कामडी आणि राजेश भोये यांना ग्रंथभेट देऊन सन्मानित करण्यात आले. अलका दराडे यांनी सूत्रसंचालन केले. मधुकर गिरी यांनी आभार मानले. दरम्यान येत्या मंगळवारी (दि.२०) कवी रवींद्र दळवी ‘काहून’ या वऱ्हाडी बोलीतील काव्यसंग्रहावर ऐसपैस गप्पा करणार आहेत.
