
जळगाव निंबायती (वार्ताहर) – आपल्या बापाला आदर्श मानून जीवनात असे कार्य करा की, पित्याला आपला सार्थ अभिमान आणि गर्व वाटावा. रोडूआण्णांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा वसा आणि वारसा त्यांच्या पश्चात तेवढाच समर्थपणे चालवत कासूताईंनी अहिल्यादेवींप्रमाणे आदर्श उभा केला आहे. जीवनात संयम ठेवून आपल्या कार्यात सातत्य ठेवावे. आततायीपणाने संसारही होत नाही व परमार्थही. असे प्रतिपादन सुप्रसिध्द किर्तनकार ह.भ.प. अविनाश भारती यांनी केले.

अहिल्यादेवी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वृक्षमित्र स्वर्गीय रोडूआण्णा पाटील यांच्या तेराव्या पुण्यतिथी निमित्ताने आयोजित जळगाव निंबायती येथील गो. य. पाटील विद्यालयाच्या प्रांगणात भव्य किर्तनात ते बोलत होते. स्वर्गीय रोडूआण्णा पाटील यांच्या समाधीचे पूजन भारती यांच्या हस्ते करण्यात आले. रोडूआण्णांनी बांधलेल्या विद्यालयरुपी ज्ञानमंदिरातून परिसरातील युवा पिढीला ज्ञानाबरोबरच समाजसेवेचा संस्कार झाला. संस्कारशील युवा पिढीवरच देशाचा भविष्यकाळ उज्ज्वल होईल. जीवनाच्या प्रवासात आध्यात्माचा मार्ग सर्वाधिक सुरक्षित व उपयुक्त ठरेल. जिजाऊंच्या प्रेरणेचा, शिवरायांच्या चारित्र्याचा व शंभूराजांच्या पराक्रमाचा आदर्श युवकांनी डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करावी, असे आवाहन यावेळी भारती यांनी उपस्थितांना केले. प्रसंगी संस्थेचे सचिव महेंद्र पाटील यांनी हभप भारती यांचा पारंपरिक पध्दतीने सत्कार केला. यावेळी श्रीमती कासूताई पाटील, जितेंद्र पाटील, समन्वयक निंबाजी शिंदे, सर्व संचालक, विश्वस्त, पदाधिकारी, पंचक्रोशीतील ग्रामस्थ, विद्यालयाचे प्राचार्य पी. एन. पवार, पर्यवेक्षक व्ही. डी. काळे, सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारींसह बहुसंख्येने युवक, विद्यार्थी पालक उपस्थित होते. प्रस्तावित प्राचार्य पी. एन. पवार यांनी केले, सूत्रसंचलन प्रा. अमोल अहिरे यांनी केले अनुमोदन ए. एफ. शिंदे यांनी दिले. तर आभार सचिन मोरे यांनी मानलेत. प्रसंगी उपस्थितांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
