नाशिक:- आदिवासी भागातील गरिबी आणि समृद्ध निसर्गाची साथ जन्मापासून लाभली. त्यातून संवेदनशीलता आली. जे जगलो; तेच शब्दांत मांडत आलो. त्यातून निर्माण झालेलं माझं आत्मकथन 'जेथोड' हे आदिवासी बांधवांच्या दैनंदिन जीवनाचे चित्र आहे, असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी हिरामण झिरवाळ यांनी केले.
गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने हुतात्मा स्मारकात आयोजित 'पुस्तकावर बोलू काही' उपक्रमात 'जेथोड' या पुस्तकावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ॲड.मिलिंद चिंधडे होते.
झिरवाळ पुढे म्हणाले की, वाचनाची प्रचंड आवड असली तरी वाचायला काही मिळण्याची सोय नसल्याने क्रमिक पुस्तके हीच आवड भागवण्याचे साधन बनले. त्याचा दुहेरी फायदा झाला. एक म्हणजे शालेय अभ्यास उत्तम झाला. त्यामुळे प्रयत्नाने यश मिळवता येते; हा आत्मविश्वास आला. शिक्षणानंतर प्राथमिक शिक्षक ते स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होत यशस्वी अधिकारी हा माझा ध्येयवादी प्रवास झाला. माझ्या जीवनावरील हे पुस्तक असले तरी यातला संघर्ष माझा एकट्याचा नाही. ते प्रातिनिधिक चित्रण आहे. माझ्यापेक्षा माझ्या आधीच्या पिढ्यांनी जे भोगले; त्याची नोंद दुर्दैवाने कुठेच झाली नाही. ते मला मांडता आले, असेही ते म्हणाले.
डॉ.अमोल पुरी आणि सुनंदा भारदे यांना ग्रंथभेट देऊन सन्मानित करण्यात आले. मधुकर गिरी यांनी सूत्रसंचालन केले. सीमाराणी बागूल यांनी आभार मानले. दरम्यान येत्या शुक्रवारी (दि.१६) देवदत्त चौधरी हे 'पळसचोंड' या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करणार आहेत.