लेखक- गजानन दशरथ पोटे अकोला 9923208775

||आम्ही भारतीय आहोत आमचा धर्म भारतीय आहे.|| विविधतेने नटलेला असा आमचा भारत देश. या देशात विविध जाती धर्माचे लोक एकोप्याने राहतात.येथे जाती धर्म भिन्न जरी असले तर भारतीय हा श्रेष्ठ धर्म मानल्या जातो. भारताची भूमी महान संत,थोर महापुरुषांची भूमी. येथे आम्हाला एकतेचा,मानवतेचा,दया,शांतीचा संदेश या महामानवांनी दिला. त्यांचा हा वारसा,त्यांचे संस्कार सोबत घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे. जाती धर्मापेक्षा देशधर्म मोठा मानायचा आहे व देशहितासाठी जगायच आहे. हिंदू ,मुस्लिम, शिख,ख्रिश्चन अशा विविध धर्मियांचा हा महान देश आहे. गेली कित्येक वर्ष आपण एकोप्याने काढलीत परंतू काही समाजकंटकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्यात भांडणे लावण्याचा प्रयत्न केला. त्यात सामान्य , भोळाभाबळा भारतीय भरडल्या गेला. काही अशिक्षित, कमी बुध्दीचे,लोभी लोक धर्म नावाची पट्टी डोळ्यावर लावून या देशाची बंधुता,एकता नष्ट करण्यासाठी या समाजकंटकांच्या इशाऱ्यावर शस्त्र हातात घेऊन आपल्याच बांधवांवर वार करतात. या दंगलीत कोणी नेता,कोणी नेत्याचा मुलगा शस्त्र घेऊन समोर नसतो. ही गोष्ट या बुद्धिहीन कार्यकर्त्यांच्या लक्षात येत नाही. बळी हा नेहमी सामान्य जनतेचा,कार्यकर्त्यांचा देऊन हे देशद्रोही आपली सत्ता आपले वर्चस्व सिद्ध करत आलेत व आहेत. ज्या देशाला स्वतंत्र करण्यासाठी हिंदू ,मुस्लिम, शिख अशा सर्व धर्मीय तरूणांनी एकजूट होऊन प्रयत्न केले व आपले प्राणपणाला लावले अशा या देशाचा आजचा तरुण जातीपातीच्या,धर्माच्या राजकारणात स्वतःच अस्तित्व विसरून या देशाच्या एकतेचा भंग करु पाहत आहे. आपली बुद्धी गहाण ठेवून, विचारहीन होऊन नको त्या मार्गावर जात आहे. प्रत्येक व्यक्तिने आपली स्वतःची बुद्धी जागेवर ठेवून या देशाचा इतिहास स्मरणात ठेवून स्वतःला भारतीय म्हणून आपला धर्मसुद्धा भारतीयच मानला पाहिजे. एकतेची, बंधुत्वाची,मानवतेची भावना आपल्या मनात जागृत करुन प्रत्येक धर्माचा,प्रत्येक भारतीयाचा प्रत्येक भारतीय नागरिकाने आदर करायला हवा. डोक्यातील धर्मांध अंधश्रद्धा दूर करून देशधर्म जवळ करावा. धर्मग्रंथात सांगीतलेला मानवधर्म स्विकारावा. मानवनिर्मित धर्मापेक्षा देशधर्म, भारतीय धर्म समजून घ्यावा व आपल्या देशाची महानता,संस्कार टिकवून ठेवावे.शेवटी एवढच म्हणू इच्छितो आम्ही भारतीय आहोत आमचा धर्म, आमची जात ही भारतीय आहे….
