
नाशिक:(प्रतिनिधी)- निसर्गाकडे बघताना लेखकाकडे नुसते डोळे असून चालत नाही. तर त्यासाठी तशी व्यापक आणि व्यासंगी दृष्टी असावी लागते. अशा निसर्गाच्या निरीक्षणातूनच उत्तम कवितेचा उगम होतो, असे प्रतिपादन कवी कृष्णा राऊत यांनी केले. गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त हुतात्मा स्मारकात आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या उपक्रमात ते ‘मांदोस’ या काव्यसंग्रहावर बोलत होते. अध्यक्षस्थानी ॲड.मिलिंद चिंधडे होते. कवी राऊत पुढे म्हणाले की, दुर्गम आणि आदिवासी भागात धान्य टिकवण्यासाठी मांदोस तयार केले जाते. त्यासाठी पाच लाकडे आणि वनस्पतींची पाने वापरली जातात. ग्रामीण भागातील जाणिवा, तिथली दुर्गम परिस्थिती, प्रथा-परंपरा यांना अधोरेखित करणाऱ्या कविता या संग्रहात आहेत. तसेच समाज परिवर्तन, शिक्षण, प्रेम असे विषयही या संग्रहातील कवितांमध्ये मांडले आहेत. निसर्ग वाचत असताना अनेक रानभाज्या, रानफुले, रानफळे यांची माहिती मिळाली. ग्रामीण भागातही सिमेंटची जंगले उभी राहिल्यामुळे निसर्ग नष्ट होत चालला आहे, ही खंतही त्यांनी व्यक्त केली. प्रा.मधुकर खोटरे आणि वसंत राऊत यांना ग्रंथभेट देऊन सन्मानित करण्यात आले. सुरेश पवार यांनी सूत्रसंचालन केले. दशरथ भोये यांनी आभार मानले. दरम्यान येत्या मंगळवारी (दि.१३) उपजिल्हाधिकारी हिरामण झिरवाळ हे राज्य पुरस्कारप्राप्त ‘जेथोड’ या आत्मकथनावर ऐसपैस गप्पा करणार आहेत.
