
नाशिक:-( प्रतिनिधी )कलेची उपासना करताना मनात एकापेक्षा एक सरस अशा जाणिवा निर्माण होतात. या विविधांगी जाणिवांचा गुच्छ म्हणजे माझ्या कविता आहेत, असे प्रतिपादन मालेगाव येथील कवी राजेश जाधव यांनी केले. गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त हुतात्मा स्मारक येथे ‘पुस्तकावर बोलू काही’ या अभिनव उपक्रमात ‘इंद्रधनुच्या कमानीवर’ या पुस्तकावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अजित कुलकर्णी होते. राजेश जाधव पुढे म्हणाले की, आपल्या अवतीभवती दीनदुबळ्यांचे शल्य, त्यांच्या वेदना कवीला स्वस्थ बसू देत नाही. त्यातूनच पोटातल्या आगीवर आणि कुणाच्या भाकरीवर कविता होऊ शकते. सासुरवाशिणीच्या मानसिकतेतून कविता निर्माण होऊन कविता निर्माण होते, असेही ते म्हणाले. याचबरोबर त्यांनी आपल्या कविता सादर केल्या. राजेंद्र देसले आणि सुशीला संकलेचा या भाग्यवान विजेत्यांना ग्रंथभेट देऊन सन्मानित करण्यात आले.सुरेश पवार यांनी सूत्रसंचालन केले तर आभार अलका दराडे यांनी मानले. दरम्यान येत्या शुक्रवारी (दि.९) कृष्णा राऊत ‘मांदोस’ या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करणार आहेत.
