
नाशिक:-(प्रतिनिधी ) रोजच्या दैनंदिन जीवनात अनेक गमतीशीर प्रसंग आपण पाहत असतो. असे प्रसंग कागदावर उतरवले की छान ललितरूप धारण करतात. वाचकाला अंतर्मुख करण्याचे सामर्थ्य अशा ललित लेखनात असते, असे प्रतिपादन सटाणा येथील साहित्यिक किरण दशमुखे यांनी केले. हुतात्मा स्मारकात गिरणा गौरव प्रतिष्ठान आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ उपक्रमात ‘मॉर्निंग वॉक’ या पुस्तकावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गोपाळ गायकवाड होते. दशमुखे पुढे म्हणाले की, केवळ तत्त्वचिंतनात्मक आणि बोजड शब्द वापरूनच सामाजिक व्यंगावर प्रहार करता येतो असे नाही, तर या पुस्तकातील ललितगद्याच्या माध्यमातून असे प्रसंग वाचकांपुढे मांडले आहेत. हसत-खेळत वाचकाला अंतर्मुख बनवता येते. सहज भाषेतून समाजावर परिणाम घडवण्याचे काम साहित्यिकाला आपल्या साहित्यातून करायचे असते. समाजाला चांगल्या-वाईटाची जाणीव करून देण्याचे काम अशा साहित्यकृतीतून होत असते, असेही ते म्हणाले. कविता कासार आणि अजित कुलकर्णी यांना ग्रंथभेट देण्यात आली. सुरेश पवार यांनी सूत्रसंचालन केले तर रमेश देसले यांनी आभार मानले. दरम्यान येत्या मंगळवारी (दि.६) ‘इंद्रधनुष्याच्या कमानीवर’ या पुस्तकावर राजेश जाधव ऐसपैस गप्पा मारणार आहेत.
