
नाशिक – समृद्धी महामार्गावरील इगतपुरीपासूनचा मुंबईकडील प्रवास आणखी जलद होण्यासाठी इगतपुरी येथे देशातील सर्वांत मोठा व पहिला सुमारे ७.८ किलोमीटरच्या सहापदरी बोगद्याचे काम पूर्ण होत आले असून, येत्या महाराष्ट्रदिनी त्याचे लोकार्पण होत आहे.* यामुळे इगतपुरी ते कसाऱ्यादरम्यानचे महामार्गावरील अंतर गाठताना होणारी दमछाक कमी होणार असून, केवळ सात मिनिटांत हे अंतर पार करता येणार आहे, हे विशेष. घोटी ते मुंबई हे अंतर अवघ्या दीड तासात पार करता येणार आहे. त्यामुळे दळणवळणाला नवा आयाम मिळेल.महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून निर्माण करण्यात आलेल्या या बोगद्यामध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात उपयोजना उभारण्यात आल्या आहेत. महामार्गातील सर्वांत आव्हानात्मक भाग असतानाही दिलेल्या मुदतीच्या सहा महिने अगोदर हे काम पूर्ण झाले आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करतानाही पाच वर्षांमध्ये येथे एकही अपघात व अथवा जीवितहानी झाली नाही, हे या प्रकल्पाचे प्रमुख वैशिष्ट्य होय.पायाभूत सुविधांसंदर्भात मैलाचा दगड ठरणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गाचे लोकार्पण येत्या १ मेस होत आहे. समृद्धी महामार्ग ६२५ किलोमीटरचा उभारताना सोळा पॅकेज वेगवेगळे करण्यात आले होते. यापैकी नागपूरपासून सुरू होणारे क्रमांक १ ते १३ नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीपर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी यापूर्वीच खुला करण्यात आलेला आहे. यामधील सर्वांत आव्हानात्मक व अवघड असलेला क्रमांक १४ पॅकेज होय, तो म्हणजे भारतातील पहिला सहापदरी ७.८ किलोमीटरचा बोगदा (टनेल) आहे.सप्टेंबर २०१९ मध्ये सुरू केलेले हे काम कोविड कालावधीतही सुरू होते. एमएसआरडीसीचे संचालक अनिलकुमार गायकवाड, मुख्य अभियंता साहेबराव सुरवसे, टनेल एक्स्पर्ट माजीद इम्रान, सुरक्षा अधिकारी जगन्नाथ मंडल व प्रकल्प व्यवस्थापक शेखर दास यांची सर्व टीम अहोरात्र हा बोगदा उभारणीमध्ये गेल्या पाच वर्षांपासून कार्यरत होती.*मिस्ट तंत्रज्ञानाने आगीपासून संरक्षण*साडेसात किलोमीटरच्या बोगद्यामध्ये वाहतूक सुरू असताना अपघात होऊन आग लागली, तर यासाठी विशिष्ट योजना व तंत्रज्ञान वापरलेले आहे. वाहनांना आग लागल्यास मिस्ट या तंत्रज्ञानामुळे आपोआपच सेंसरद्वारे पाण्याचे फवारे सुरू होतील. त्यामुळे आग आटोक्यात येईल. बोगद्याच्या वरच्या भागावर विशिष्ट केमिकल लावण्यात आले आहे. त्यामुळे आग लागली तरी ती किमान दोन तास इतर भागांमध्ये पसरणार नाही.*देखभाल दुरुस्तीसाठी क्रॉस पॅसेज*संपूर्ण बोगद्यामध्ये २६ ठिकाणी क्रॉस पॅसेजद्वारे वाहतूक वळविण्याची सोय करण्यात आली आहे. बोगद्यामध्ये जर देखभाल दुरुस्तीचे काम सुरू असेल तर विशिष्ट अंतरावर वाहतूक एका क्रॉस पॅसेजमधून दुसऱ्या ठिकाणी वळविता येईल.*नादुरुस्त वाहनांसाठी सात ठिकाणी जागा*बोगद्यामध्ये वाहनांमध्ये काही बिघाड झाल्यास वाहतुकीस अडथळा होऊ नये, तसेच वेगाने येणाऱ्या वाहनाने नादुरुस्त झालेल्या वाहनाला मागून धडक देऊ नये यासाठी संपूर्ण बोगद्यामध्ये विशिष्ट अंतरावर ७ ले बाय विशिष्ट जागा ठेवण्यात आल्या आहेत.*बोगद्याच्या प्रवेशात विशिष्ट प्रकाश योजनेची रचना*वाहनांचा बोगद्यामध्ये विशेष करून दिवसा प्रवेश होईल. त्या वेळी बाहेरील नैसर्गिक प्रकाश व बोगद्यामधील प्रकाश यामध्ये काही फरक वाहनचालकांना जाणवू नये, यासाठी बोगद्याच्या अलीकडे ४०० मीटर लांबीचे शेड बनविण्यात आले आहे. त्या शेडमधून बोगद्यात जाताना हळूहळू नैसर्गिक प्रकाश कमी होत जातो. जेणेकरून वाहनचालकांना बोगद्याबाहेरील व आतील वातावरण एकसारखे जाणवेल.*आपत्कालीन परिस्थितीसाठी पर्यायी वेगळा बोगदा*साडेसात किलोमीटरच्या बोगद्यामध्ये व्हेंटिलेशनसाठी विशिष्ट तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. बोगद्यामध्ये हवा खेळती राहावी व त्यामध्ये कार्बन डायऑक्साइड व मोनॉक्साइड तयार होऊ नये म्हणून इन्कलाइड व्हेंटिलेशन शेफ्ट पाचशे मीटरचा एक वेगळा बोगदा तयार केला आहे. त्याद्वारे आपत्तीकालीन परिस्थितीत वाहने तिथून बाहेर पडू शकतात.*एफकॉन कंपनीने उभारला आव्हानात्मक बोगदा*या आव्हानात्मक बोगद्याची काम एफकॉन या कंपनीला मिळाले आहे. ज्या कंपनीने अगोदरही दिल्ली मेट्रो, बुलेट ट्रेन, जम्मू-कश्मीर येथील चिनाब नदीवरील पूल, श्रीनगर-दिल्ली कटरा मार्ग अशी कामे केलेली आहेत.*ही आहेत वैशिष्ट्ये** लांबी ७.८ किलोमीटर* उंची ९.२ मीटर* रुंदी १७ मीटर* मुंबई व नागपूर दोन्ही बाजूंसाठी स्वतंत्र बोगदे* कामाचा कालावधी पाच वर्षे* चार हजार अभियंते,* कर्मचारी कार्यरत* एकूण खर्च तीन हजार कोटी रुपये* बोगद्याच्या दर्शनी भागावर भारतीय संस्कृती, अध्यात्म, प्राणी-पक्षी, आदिवासी संस्कृतीचे चित्र रेखाटन* संपूर्ण बोगदा हा सीसीटीव्हीच्या नियंत्रणाखाली* दुरुस्तीसाठी पायी जाण्यास स्वतंत्र व्यवस्था* नेटवर्क व अत्यावश्यक सूचनांसाठी यंत्रणा
