
नाशिक:-( प्रतिनिधी )कवितेमध्ये आपल्या जगण्याचे प्रतिबिंब उतरले पाहिजे. खोल गेलेल्या विहिरीचा तळ शोधताना बळीराजा असलेल्या बापाची तगमग संवेदनशीलपणे मांडत गेलो. कारण कविता ही आत्मचिंतन करण्याची प्रक्रिया आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी सचिन गांगुर्डे यांनी केले.
गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने हुतात्मा स्मारकात आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या उपक्रमात ते ‘जमीन कसण्याची कला’ या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिका सुशीला पिंप्रीकर होत्या.
सचिन गांगुर्डे पुढे म्हणाले की, जमीन कसणे ही अतिशय अवघड कला आहे. अस्मानी-सुलतानीच्या चक्रव्यूहात अडकलेली जमीन नापीक होत आहे. शेतातलं पीक जपताना शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागते. कवितेमधून जगण्याची उमेद मिळायला हवी. समाजाचे आपण देणे लागतो. म्हणूनच कवीने सामाजिक जाणीव जपली पाहिजे, असे सांगून त्यांनी काव्यसंग्रहातील विविध कविता सादर केल्या.
उषा शिरसाठ आणि रजनी वाणी यांना ग्रंथभेट देण्यात आली. मधुकर गिरी यांनी आभार मानले. सुरेश पवार यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान येत्या मंगळवारी (२६) गोदाकाठ या पुस्तकावर संजय निकम ऐसपैस गप्पा करणार आहेत.(
