
नाशिक:(प्रतिनिधी ) प्राथमिक शाळांची नोंदणी शिक्षण विभागाकडे बंधनकारकयेवला पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या शाळांचा (नर्सरी, एल.के.जी.; यू.के.जी.) आता शालेय शिक्षण विभागाच्या कार्यक्षेत्रात समावेश करण्यात आला. त्यामुळे अशा खासगी शाळांना शिक्षण विभागाच्या ‘प्री-स्कूल रजिस्ट्रेशन’ पोर्टलवर सात दिवसांत नोंदणी करणे बंधनकारक आहे, अशी माहिती शालेय शिक्षण विभागाने दिली.राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार शिक्षणाचा ५+३+३+४ असा आकृतिबंध निश्चित करण्यात आला असून, त्यातील पहिल्या पाच वर्षांत पूर्व प्राथमिक शिक्षणाचा समावेश आहे. त्यामुळे तीन ते सहा वर्षे वयोगटातील बालकांचे शिक्षण शाळांच्या अधिकृत चौकटीत आणले जाते.राज्य व केंद्र सरकारने या टप्प्यासाठी स्वतंत्र अभ्यासक्रम आराखडा तयार केला आहे. सद्यस्थितीत अनेक खासगी संस्था पूर्व प्राथमिक शिक्षण देत असल्या तरी त्यांची कोणतीही अधिकृत नोंद नाही. त्यामुळे नव्या नियमानुसार सर्व शाळांनी तातडीने नोंदणी करून शिक्षण विभागाच्या मार्गदर्शना खाली कार्य करणे आवश्यक आहे.
