
पिंपरखेड (ता. नांदगाव) : दिनांक २९ एप्रिल २०२५ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पिंपरखेड येथे नायडोंगरी केंद्राच्या संयुक्त शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले. या शिक्षण परिषदेत पिंपरखेड, आटकाट तांडा, तारूतांडा व दत्तनगर या शाळांचा समावेश होता.

परिषदेमध्ये शिक्षणाशी संबंधित विविध उपक्रम, मार्गदर्शन सत्रे व कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या.या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोरख चव्हाण, उपाध्यक्ष मनीषा जाधव, सदस्य रमेश दळवी, सरपंच मंजुषा गरुड, तसेच नायडोंगरी केंद्राचे केंद्रप्रमुख राजेंद्र पाटील व सर्व केंद्रातील शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक बापू सुरसे यांनी केले.परिषदेमध्ये ‘निपुण महाराष्ट्र’ या राज्यस्तरीय उपक्रमांतर्गत लेखन कौशल्याचा स्तरनिहाय सराव व नियोजन, तसेच संख्याज्ञान या विषयांवर मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले.

विविध उदाहरणांच्या माध्यमातून शिक्षकांना अध्यापनाच्या पद्धती अधिक प्रभावी कशा बनवाव्यात, याविषयी सखोल माहिती देण्यात आली.या परिषदेमध्ये एक विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे बुके नको, बुक हवे या राज्याचे शिक्षणमंत्री मा. दादाजी भुसे यांच्या संकल्पनेवर आधारित उपक्रम. या उपक्रमांतर्गत पिंपरखेड शाळेचे शिक्षक मनोज डोंगरे यांनी उपस्थित सर्व मुख्याध्यापकांना “श्यामची आई” व इतर वाचनीय पुस्तके भेट दिली. या अभिनव उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.

केंद्रप्रमुख राजेंद्र पाटील यांनी प्रशासकीय बाबींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी मनोज डोंगरे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.ही शिक्षण परिषद शैक्षणिकदृष्ट्या समृद्ध आणि प्रेरणादायी ठरली. सर्व सहभागी शिक्षकांनीही अशा उपक्रमांची सातत्याने गरज असल्याचे मत व्यक्त केले.
