
नासाका विद्यालयातील संस्कार वर्गात विद्यार्थ्यांसमवेत मार्गदर्शक प्रा.राजेश्वर शेळके, कवी शरद आडके, कामगार नेते प्रशांत कापसे, मुख्याध्यापक अरुण पगार, संयोजक रवींद्र मालुंजकर, कैलास लहांगे आदी.
नाशिकरोड:-(प्रतिनिधी ) आपले कुटुंब आणि शाळा यांच्याकडून झालेले विविधांगी संस्कार आयुष्यभरासाठी दिशादर्शक असतात. योग आणि व्यायामासह श्लोक, वळणदार हस्ताक्षर यांतून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरणारा ‘संस्कारवर्ग’ सलग तिसऱ्या वर्षी नासाका विद्यालयात भरला! पळसे येथील नासाका कार्यस्थळावरील माध्यमिक विद्यालयात आयोजित या संस्कार वर्गात तज्ज्ञ मार्गदर्शक प्रा.राजेश्वर शेळके यांनी व्यायामाचे प्रकार आणि गरज, श्लोक, सुंदर हस्ताक्षर, मातापित्यांसह गुरूंचे महत्त्व याबद्दल हसत-खेळत मार्गदर्शन केले. मधल्या सुट्टीत सर्वांनी अल्पोपहाराचा आस्वाद घेतला. मुख्याध्यापक अरुण पगार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या समारोप सत्रास श्रीमंतश्री नर्सरीचे संचालक कवी शरद आडके, ज्येष्ठ कामगार नेते प्रशांत कापसे मंचावर उपस्थित होते. शाळेतील संस्काराची शिदोरी आयुष्यभर पुरते. संस्कारांचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याने ग्रामीण भागात अशा संस्कार वर्गांची खऱ्या अर्थाने गरज आहे. अशा संस्कार शिबिरांतून मिळणारी शिदोरी जीवनात महत्त्वपूर्ण असते, असे विचार पाहुण्यांनी मांडले. मान्यवरांच्या हस्ते सहभागी विद्यार्थ्यांसह इतर सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले. निवडक विद्यार्थ्यांनी अनुभवकथन केले. मुख्याध्यापक अरुण पगार यांनी स्वागत केले. संयोजक रवींद्र मालुंजकर यांनी प्रास्ताविक केले. सांस्कृतिक विभागप्रमुख कैलास लहांगे यांनी आभार मानले.
