
नाशिक ( प्रतिनिधी ) ज्ञानेश्वर माऊलींने माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।या ओळीतून मराठी भाषेवरील प्रेम आणि अभिमान व्यक्त केला . त्यासाठी मराठी भाषा वाचली आणि वाचलीच पाहिजे . याच उद्देशाने 16 वर्षांपासून नाशिक शहरातील कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्यातर्फे वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी आणि मराठी साहित्याचा गंध जगभर दरवळावा या उद्देशाने वाचकांसाठी मराठी दर्जेदार साहित्याच्या विविधतेने नटलेली ग्रंथपेटी उपलब्ध करून देण्यासाठी योजनेचे प्रणेते विनायक रानडे यांच्या संकल्पनेतून *ग्रंथ तुमच्या दारी* ही वाचकप्रिय अभिनव योजना सुरू केली , आज मितीस जगभरातील 16 देशात विस्तारलेल्या या योजनेद्वारे अंदाजे 4 कोटींहून अधिक मूल्य असलेली अमूल्य ग्रंथसंपदा वाचनासाठी उपलब्ध होत आहे मागच्याच महिन्यात अमेरिकेतील फिलाडेल्फिया शहरातील *श्री पुलस्ती चौधरी* यांनी विनायक रानडे यांना संपर्क साधून या योजनेची विस्तृत माहिती घेतली आणि फिलडेल्फिया येथे मराठी ग्रंथसंपदा वाचनासाठी उपलब्ध करून द्यावी या विचाराने प्रेरित होऊन त्यासाठी स्वतः समन्वयक या नात्याने सक्रिय पुढाकार घेतला अल्पावधीतच फिलाडेल्फिया येथील मराठी साहित्यावर प्रेम करणारी अनेक वाचक कुटुंब या योजनेत सहभागी झाले , नाशिक मधील मीरा तुषार शिंगोटे यांची सून शिवानी रत्नपारखी शिंगोटे हिने हिरीरीने सहभागी होऊन प्रत्यक्ष ग्रंथ पेट्या उपलब्ध होण्यासाठी मोलाची मदत केली , अर्थातच कुसुमाग्रज प्रतिष्ठान सोबत बऱ्याच वर्षापासून जोडल्या गेलेल्या नाशिकच्या सौ मीरा शिंगोटे यांनीही सक्रिय साथ दिली , सर्व सहभागी वाचक कुटुंब यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिल्यामुळे मोठ्या वाचकांच्यासाठी *19 ग्रंथ पेट्या* आणि त्या सोबतच बाल वाचकांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी नाशिकच्या अशोका ग्रुपचे संचालक *श्री संजय लोंढे* यांच्या बहुमूल्य देणगीतून पुरस्कृत *4 बाल ग्रंथ पेट्या* कुसुमाग्रज प्रतिष्ठान द्वारे *फिलाडेल्फिया* येथे रवाना झाल्या जगभरातील मराठी वाचकांना पुस्तके उपलब्ध व्हावीत यासाठी विनायक रानडे आणि त्यांचे सर्व सहकारी ग्रंथ तुमच्या दारी योजना विस्तारित ठेवण्यासाठी अविरत प्रयत्न करत असतात
