
पाटोळे (ता. सिन्नर) येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत प्रशासनाने गावपातळीवर प्रभावी अंमलबजावणी करत विकासाचा आढावा घेतला. यावेळी गटविकास अधिकारी अशोक भवारी व ग्रामपंचायत विस्तार अधिकारी निलेश भुजाळ यांनी प्रत्यक्ष भेट देऊन ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.

गावातील मारुती मंदिरात आयोजित बैठकीत ग्रामस्थ व कर्मचाऱ्यांना अभियानाची सविस्तर माहिती देण्यात आली. ग्रामपंचायतीचे दप्तर तपासून आवश्यक सुधारणा सुचविण्यात आल्या. तसेच प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना भेट देऊन त्यांना प्रोत्साहन देण्यात आले. गावात प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती करण्यात आली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच प्रलंबित करवसुलीची मोहीम राबवून ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात वाढ करण्यावर भर देण्यात आला. या अभियानांतर्गत अधिकाऱ्यांनी व ग्रामस्थांनी श्रमदान करून स्वच्छतेचा संदेश दिला. गावात स्वच्छता अभियान राबवून परिसर स्वच्छ करण्यात आला. “गुणदान” संकल्पनेबाबत सखोल मार्गदर्शन करत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सहभाग आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले.यावेळी सरपंच सौ. संगिता आव्हाड, उपसरपंच सौ. गितांजली कराड, ग्रामपंचायत अधिकारी ज्ञानेश्वर भोर, सदस्य सुनिल सांगळे, देविदास कराड, माजी सरपंच मेघराज आव्हाड, सोपान खताळे, विलास खताळे, मुख्याध्यापक वसंत गोसावी, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकारी डॉ. वंदना कांगणे, अंगणवाडी पर्यवेक्षिका माधुरी फसाळे, कल्पना गरुड आदी अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

याशिवाय डुबेरेवाडी, धोंडवीरनगर, रामनगर, धुळवड, पिंपळे, चापडगाव, सोनेवाडी, नळवाडी, कासारवाडी, खंबाळे, गोंदे, शिवाजीनगर (दापुर), दत्तनगर, चास, ठाणगाव, दोडी खुर्द, कणकोरी, मानोरी, निह्राळे आदी गावांतील ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामरोजगार सेवक, अंगणवाडी सेविका, संगणक ऑपरेटर, आरोग्य व शिक्षण विभाग कर्मचारी, महिला बचत गट, स्वच्छ भारत मिशन ,ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. या भेटीमुळे पाटोळे ग्रामपंचायतीला विकासाच्या दिशेने नवी गती मिळाली असून ‘समृद्ध गाव’ उभारणीसाठी प्रशासन व ग्रामस्थ यांची संयुक्त जबाबदारी अधिक बळकट झाली आहे.
