
पाटोळे (प्रतिनिधी ) श्री शिवनिश्चल योगभारती फाउंडेशन व बेटर हेल्थ डायग्नोसिस सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटोळे येथे मोफत रक्तगट तपासणी शिबिर उत्साहात संपन्न झाले. शाळेच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित या आरोग्य उपक्रमामुळे कार्यक्रमाचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले. या शिबिरामध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी करण्यात आली.यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुदाम पानसरे, सदस्य सोपान खताळे, ज्ञानेश्वर कराड, रामदास खताळे, तसेच पालक शिवाजी कराड आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री शिवनिश्चल योग भारती फाउंडेशनचे सरचिटणीस तथा शाळेचे मुख्याध्यापक वसंत गोसावी यांनी केले. त्यांनी रक्तगट तपासणीचे शैक्षणिक व आरोग्यदृष्ट्या असलेले महत्त्व स्पष्ट करत विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य जागृती निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज अधोरेखित केली.
बेटर हेल्थ डायग्नोसिस सेंटर चे श्री कुलदीप पाटोळे व रेवन दळवी यांनी विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी केली. शिबिर अत्यंत शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी शाळेतील शिक्षक सुनिता बर्वे, कैलास पवार, मिना सोनवणे, प्रतिभा पवार, स्वाती खताळे, सुनिता खताळे आदींनी संयोजन केले. यावेळी सदस्य सोपान खताळे यांनी शाळेच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त राबविण्यात आलेला हा आरोग्य उपक्रम निश्चितच स्तुत्य व प्रेरणादायी असल्याचे नमूद केले. श्री शिवनिश्चल योगभारती फाउंडेशनच्या वतीने समाजोपयोगी उपक्रमांच्या मालिकेतून हे मोफत रक्तगट तपासणी शिबिर झाले. योग, प्राणायाम आणि आरोग्य जागृतीसह समाजातील सर्व घटकांसाठी कार्य करणारी श्री शिवनिश्चल योगभारती फाउंडेशन ही संस्था केवळ योग शिक्षणापुरती मर्यादित न राहता प्रत्यक्ष आरोग्य सेवांद्वारे सामाजिक बांधिलकी जपत असल्याचे या उपक्रमातून स्पष्ट होते असे श्री. पानसरे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या आरोग्याविषयी लहान वयातच जागरूकता निर्माण व्हावी, भविष्यात आपत्कालीन परिस्थितीत रक्तगटाची माहिती सहज उपलब्ध व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी असा मोफत उपक्रम अत्यंत उपयुक्त व मार्गदर्शक ठरणार आहे.

आरोग्यदायी समाज निर्मितीसाठी योगासोबत वैद्यकीय जागृतीची जोड देणारे श्री शिवनिश्चल योग भारती फाउंडेशनचे हे कार्य निश्चितच अनुकरणीय व प्रेरणादायी ठरत आहे
सदर कार्यक्रमाचा संपूर्ण खर्च श्री शिवनिश्चल योग भारती फाउंडेशन ने उचलल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी फाउंडेशनचे विशेष अभिनंदन केले. योगासोबत आरोग्यसेवेची जोड देत समाजोपयोगी कार्य करणाऱ्या संस्थेचे हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद ठरले आहे.
