
नांदगाव :- ( प्रतिनिधी ) मविप्र समाज संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ अत्यंत उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात पार पडला. शालेय जीवनाचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण करून आयुष्याच्या नव्या क्षितिजाकडे झेप घेणाऱ्या विद्यार्थ्यांना यावेळी मार्गदर्शन व शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली. यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ज्योती काळे, जेष्ठ शिक्षक अशोक मार्कंड, जगन्नाथ पाटील आणि सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.
मविप्र संस्थेचे संचालक इंजि. अमित भाऊ बोरसे-पाटील यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी व पुढील वाटचालीस शुभेच्छा संदेश दिला.

निरोप समारंभाच्या निमित्ताने बोलताना विद्यार्थी भावूक झाले होते. स्वरा जाधव व वेदिका जाधव ह्या विद्यार्थ्यिनींनी आपल्या मनोगतातून शाळेतील पहिले पाऊल, शिक्षकांचे प्रेम आणि मित्र-मैत्रिणींसोबत घालवलेले क्षण यांविषयीच्या आठवणींना त्यांच्या कवितेतून व मनोगतातून उजाळा दिला.
उपशिक्षक अण्णासाहेब दुकळे यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी ‘टिप्स’ देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आशीर्वाद दिले.
मुख्याध्यापिका ज्योती काळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की,” दहावी ही केवळ परीक्षा नसून आयुष्याची एक नवी सुरुवात आहे. विद्यार्थ्यांनी केवळ गुणांच्या मागे न धावता एक उत्तम नागरिक बनण्यावर भर द्यावा आणि जिद्द व चिकाटीने आपले ध्येय गाठावे.”
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ममता जैन हिने केले, तर आभार प्रदर्शन किरण नरोटे हिने मानले. एकमेकांचा निरोप घेताना विद्यार्थ्यांच्या डोळ्यात पाणी असले, तरी उद्याच्या यशाचा विश्वास त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.
