
ओझर: (वार्ताहर ) वयाच्या ९ व्या वर्षापासून बालकलाकार पासून ते आजपर्यंत गेली ५४ वर्ष रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर या मराठमोळ्या लोकनाट्य तमाशा मंडळातून लोकांचे मनोरंजन व प्रबोधन करणारे मास्टर रघुवीर खेडकर यांना नुकतेच भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड या छोट्याशा गावातून पुढे आलेले मास्टर तुकाराम खेडकर हे अतिशय लोकप्रिय तमाशा कलावंत मा.रघुवीर पाच वर्षाचे असतानाच पितृछत्र हरपले. आई कांताबाई सातारकर यांनी मा.रघुवीर ला बरोबर घेऊन पुढे तमाशा ही कला जोपासली. नुकतीच काल संगमनेर येथे मास्टर रघुवीर खेडकरांची भेट घेतली.मी स्वतः लिहिलेल्या शिवचरित्र पुस्तकातील एका प्रकरणावर “प्रतापगडचा रनसंग्राम अर्थात अफजल खान वध” या शिवछत्रपतींच्या रोमहर्षक प्रसंगावर पहिल्यांदाच तमाशा रंगमंचावर वगनाट्याच्या स्वरूपात सादरीकरण होणार आहे. या क्षणाचा मला खूप अभिमान व आनंद वाटला. मास्टर राजू शेठ व सिनेतारका मंदा राणी खेडकर यांच्याशी देखील चर्चा झाली.यावेळी डॉ. जयराम ढिकले, कैलास ढिकले, आत्माराम शिंदे, संजय मुरकुटे, कलावंत व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.अतिशय प्रतिकूल परिस्थितीत विशेषता कोरोनाच्या काळात घरातील तीन कर्ते कलावंत काळाने हिरावून घेतले. होते नव्हते ते सर्व या कठीण काळात चाळीस लाख रुपये व महिलांच्या गळ्यातील वीस तोळे सोने मोडून तमाशा ही कला जिवंत ठेवली. कलावंत सांभाळले. एव्हढेच नाही तर तमाशातून निवृत्त झालेले घरादारापासून दूर केलेले वृद्ध कलावंत ते सांभाळतात. हे सांगत असताना नकळत त्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणवल्या. त्यांच्या जीवनातील काही प्रसंग ऐकताना आमच्या अंगावर शहारे उभे राहत होते.काही दिवसांपूर्वी स्वतःची श्री साई हॉस्पिटल नासिक येथे डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांच्याकडे दोनदा एन्जिओ प्लास्टी व एकदा ओपन हार्ट सर्जरी झालेली असतानाही तीनच महिन्यात परत ते रंगमंचावरती उभे राहिले. मातीतला कलावंत जमिनीवर बसूनच हे सर्व संवाद साधत होते. पद्मश्री हा सन्मान माझा एकट्याचा नसून माझ्या सर्व तमाशा कलावंत सृष्टीचा आहे. त्यांना समर्पित करतो असे अभिमानाने सांगायला ते विसरले नाही. पुढे ते म्हणतात मी अजूनही स्वतःला चिमटा घेऊन विचारतो की, खरंच मला पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे का?सलाम त्या कलेला. सलाम त्या पद्मश्री मास्टर रघुवीराला…
सोपान वाटपाडे, शिवचरित्रकार, ओझर मिग, नाशिक
