
आई भवानी मंदिर कामासाठी देणगी देताना रामकृष्ण नाईक, समवेत वृक्ष मित्र परिवाराचे सोपान बोडके, प्रशांत डावरे आदी.
सिन्नर (वसंत गोसावी, प्रतिनिधी) : सोनांबे (ता. सिन्नर) येथील आई भवानी वृक्ष मित्र परिवार यांच्या वतीने सुरू असलेल्या वृक्षसंवर्धन व आई भवानी मंदिराच्या जतन-संवर्धनाच्या कार्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. परिसरातील हरित उपक्रम आणि मंदिराच्या सुशोभीकरणाचे काम पाहून अनेकांनी स्वयंस्फूर्तीने मदतीचा हात पुढे केला आहे.
मुंबई येथील साईभक्त रामकृष्ण नाईक यांनी मंदिराच्या रंगकामासाठी तब्बल ५१ हजार रुपयांची देणगी जाहीर केली. दरवर्षी घोटी–सिन्नर मार्गे निघणारा साई पालखी सोहळा आई भवानी मंदिर परिसरातून जातो. या पवित्र स्थळी होत असलेले वृक्षसंवर्धन व मंदिर संवर्धनाचे कार्य पाहून नाईक परिवार प्रभावित झाला आणि त्यांनी ही उदार मदत दिली.
तसेच, येथील कै. सखुबाई आत्माराम पवार यांच्या वर्षश्राद्धानिमित्त पवार परिवाराने पाच हजार रुपयांची देणगी अर्पण केली. कोनांबे येथील रहिवासी व सध्या कल्याण येथे व्यावसायिक असलेले प्रशांत डावरे यांनीही दोन हजार रुपयांची मदत करून सामाजिक बांधिलकी जपली.
वृक्षसंवर्धन आणि मंदिर संवर्धन या दुहेरी उपक्रमामुळे परिसराचे धार्मिक व पर्यावरणीय महत्त्व अधिक अधोरेखित झाले आहे. स्थानिक ग्रामस्थांनी या कार्याचे कौतुक करत पुढील काळातही अशाच प्रकारे सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे. “हरित परिसर – पवित्र संस्कार” या भावनेतून सुरू असलेले हे कार्य इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.
